Chinese Influencer Died In Viral Challenge: चीनमध्ये (China) ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग सुरु असतानाच मद्यप्राशन (Alcohol Drinking) करणाऱ्या एका सोशल मीडिया स्टारचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेला तरुण सोशल मीडियावर ब्रदर हुआंग नावाने प्रसिद्ध होता. या 27 वर्षीय तरुणाचं खरं नाव मोनिकर झोंग युआन हुआंग असं होतं. या तरुणाच्या पत्नीनेच त्याच्या मृत्यूची माहिती जिमू न्यूजला दिली आहे. मंगळवारी ब्रदर हुआंग लाइव्ह स्ट्रीमींगदरम्यान (viral challenge) मद्यप्राशन करत होता. मात्र जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार लाइव्ह स्ट्रीमींगदरम्यान जास्तीत जास्त दारु पिण्याचं चॅलेंज ब्रदर हुआंगने स्वीकारलं होतं. याच प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला. चीनमध्ये मागील एका महिन्यात अशाप्रकारे ऑनलाइन चॅलेंजमुळे झालेला दुसरा मृत्यू आहे.
चीनमध्ये सध्या ड्रिंकिंग चॅलेंज व्हायरल झालं आहे. हुआंग हा या चॅलेंजने घेतलेला दुसरा बळी ठरला आहे. सोशल मीडियावर हुआंगचे 1 लाख 76 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. हुआंगने जी दारु या ऑनलाइन चॅलेंजमध्ये प्यायली तिचं नाव 'चिनी फायरवॉटर' असं आहे. यामध्ये 35 ते 60 टक्के अल्कोहोल असतं. व्हायरल झालेल्या या ड्रिंकिंग चॅलेंजच्या व्हिडीओमध्ये हुआंग एकामागोमाग एक दारुच्या बाटल्या रिचवताना दिसत आहे. दारुची बाटली रिकामी झाल्यानंतर तो त्या एकमेकांवर उभ्या करुन ठेवताना व्हिडीओ दिसतोय.
हुआंगच्या आधी काही दिवसांपूर्वी वांग नावाच्या 34 वर्षीय सोशल मीडिया स्टारचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. वांगने एकाच वेळेस 7 बाटल्या दारु प्यायली होती. अती मद्यसेवनाने वांगचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये मागील काही काळापासून हे ड्रिंकिंग चॅलेंज तुफान व्हायरल झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ सामान्य नागरिकच नाही तर लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स असणारे सोशल मीडिया स्टार्सही या चॅलेंजमध्ये सहभागी होत आहे. पीके चॅलेंज नावाने हे चॅलेंज अनोखळी व्यक्ती एकमेकांशी स्पर्धा करत खेळतात. ऑनलाइन माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या चॅलेंजमध्ये दोन अनोखळी व्यक्ती एकमेकांना गाण्याचं, डान्सचं, पुश अप्सचं चॅलेंज देतात. जिंकणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहणारे लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे पैसे देतात. तर पराभूत होणाऱ्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते. वांगलाही अशाच पद्धतीची शिक्षा म्हणून शक्य तितकी दारु पिण्यासं सांगण्यात आलेलं. हिच शिक्षा पूर्ण करताना वांगचा मृत्यू झाला.