जगावर पुन्हा युद्धाचे ढग; चीन - अमेरिका आमने-सामने तर तैवानमध्ये युद्धाभ्यास सुरु

Nancy Pelosi in Taiwan : रशिया - युक्रेन युद्ध सुरु असताना पुन्हा एकदा जग संकटाच्या खाईत दिसून येत आहे. जगावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा झाले आहे.  

Updated: Aug 3, 2022, 10:16 AM IST
जगावर पुन्हा युद्धाचे ढग; चीन - अमेरिका आमने-सामने तर तैवानमध्ये युद्धाभ्यास सुरु title=

वॉशिंग्टन : Nancy Pelosi in Taiwan : रशिया - युक्रेन युद्ध सुरु असताना पुन्हा एकदा जग संकटाच्या खाईत दिसून येत आहे. जगावर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमा झाले आहे. यावेळी तैवानच्या मुद्द्यावरुन चीन आणि अमेरिका आमने सामने आले आहेत. त्यामुळे युद्धाची भीती व्यक्त होत आहे.

अमेरिकन संसदेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी या काल रात्री अचानक तैवानमध्ये दाखल झाल्या. चीनने या भेटीविरोधात आधीच अमेरिकेला थेट वॉर सिग्नल दिला आहे. चीनच्या धमकीला भीक न घालता अमेरिकन स्पीकर तैवानमध्ये दाखल झाल्याने चिनी एअरफोर्सच्या 21 फायटर जेट्सनी तैवानच्या हवाई हद्दीचा भंग करत तैवानच्या आकाशात घुसखोरी केली. 

दरम्यान, चीनने आता तैवानच्या पूर्वेला थेट क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरु केला आहे. तैवान स्ट्रेटमध्ये चीनने लाँग रेंज फायर ड्रिल्स सुरु केली आहेत. 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान चीन संपूर्ण तैवानच्या भोवती समुद्रात क्षेपणास्त्रांसह युद्धाभ्यास सुरु करणार आहे. 

याशिवाय तैवानच्या लष्करी तळांवरही चीन हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे तैवाननंही दंड थोपटले असून लष्कराला दुस-या लेव्हलच्या अलर्टवर ठेवण्यात आलंय. सर्व लष्करी अधिका-यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्यात. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरु असताना आता चीन आणि तैवानमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे.