चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

China School Fire : खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Jan 21, 2024, 08:12 AM IST
चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू title=

China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर धक्का बसलाय.  

खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र 'द पीपल्स डेली'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका शाळेत हा प्रकार घडला. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता आग लागल्याचे वृत्त आहे. हेबेई प्रांतातील सरकारी माध्यम संस्था 'झोंगलान न्यूज'ला एका शिक्षकाने आगीच्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. मरण पावलेली सर्व मुले तिसरीच्या वर्गातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. दुर्घनाग्रस्त शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु करण्यात आले. 
यादरम्यान घटनास्थळावरून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तसेच पोलिसांकडून नानयांग शहराजवळ असलेल्या शाळेच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मृतांची ओळख आणि आगीचे कारण याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

दुर्घटनेच्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. साधारणपणे प्राथमिक वर्गातील विद्यार्थी या बोर्डिंग स्कूलमध्ये राहतात. यिंगकाई शाळा ही 10 वर्षे जुनी खाजगी शाळा आहे. साधारणपणे आजूबाजूच्या गावातील मुलं येथे शिक्षण घ्यायला येतात. शाळेतील वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर मुली राहतात, तर मुले तिसऱ्या मजल्यावर राहतात. 

अपघाताची चौकशी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.