Harry Potter And The Philosopher Stone: हॅरी पॉटर आणि हॉगवर्ट्स स्कूलच्या रहस्यमय जगाची भूरळ पडलेल्या चाहत्यांसाठी एक रंजक बातमी आहे. जादूच्या थिमवर आधारीत हॅरी पॉटर चित्रपटांची मालिका प्रदर्शित होण्याआधी लेखिका जे. के. रोलिंग यांनी दिलेल्या पुस्तकानेही अनेक विक्रम मोडीत काढले होते. या पुस्तकांच्या सिरीजमधील पहिलं पुस्तक होतं हॅरी पॉटर अॅण्ड द फिलॉसॉफर्स स्टोन. याच पुस्तकाच्या एका खास प्रतीला नुकतीच लाखो रुपयांची बोली मिळाली असून ही किंमत खरोखरच थक्क करणारी आहे.
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात 'हॅरी पॉटर अॅण्ड द फिलॉसॉफर्स स्टोन' पासून होते. तुम्ही सुद्धा या सिरीजचे चाहते असाल तर तुम्हाला हॉगवर्ट्स आणि हॅरीच्या रंजक जगाची नक्कीच भुरळ पडली असेल. जे. के. रोलिंग यांच्या या कथेमध्ये 11 वर्षाच्या हॅरीला पहिल्यांदा हॉगवर्ट्समधून पत्र येतं आणि त्याची जादुई जगाशी ओळख होते यासंदर्भातील रंजक कथानक पुस्तकात आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून या रहस्यमय जगातील अनेक गोष्टींची चाहत्यांनाही पहिल्यांदाच ओळख झाली होती. 'हॅरी पॉटर अॅण्ड द फिलॉसॉफर्स स्टोन'च्या याच पुस्तकाच्या पहिल्या 500 प्रतिंपैकी एक असलेली प्रत तब्बल 10 हजार 500 पौंडला विकली गेली आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हे पुस्तक लिलावामध्ये तब्बल 11 लाख रुपयांना विकलं गेलं आहे. ही महिती लिलाव करणाऱ्या कंपनीने फेसबुकवर दिली आहे.
'हॅरी पॉटर अॅण्ड द फिलॉसॉफर्स स्टोन'ची पहिली प्रत ब्लूम्सबरीने 1997 साली प्रकाशित करण्यात आलं होतं. पहिल्या प्रतीचं कव्हर हे पुठ्याचं होतं. या पुस्तकाच्या केवळ 500 प्रती छापण्यात आलेल्या. त्यापैकी 300 प्रती वाचनालयांना पाठवण्यात आलेल्या. उरलेल्या 200 प्रतींची विक्री करण्यात आलेली. वाचनालयांना देण्यात आलेल्या प्रतींपैकी एका पुस्तकाचा लिलाव ऑनलाइन माध्यमातून करण्यात आला. या पुस्तकाच्या पहिल्या प्रतीची मूळ किंमत त्यावेळी भारतीय चलनानुसार 32 रुपये इतकी होती. हॅरी पॉटर सिरीजमध्ये यानंतर एकूण 6 पुस्तकं प्रकाशित झाली. या सहाही पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळाला. जे. के. रोलिंग या लेखिका म्हणून हॅरी पॉटर सिरीजमुळे प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्या सध्या जगातील आघाडीच्या लेखिकांपैकी एक मानल्या जातात. हॅरी पॉटरच्या लोकप्रियतेमुळे जे. के. रोलिंग यांना मानधन आणि रॉयल्टी स्वरुपात प्रचंड संपत्ती मिळाली. या सर्वच पुस्तकांमधील कनाथनावर नंतर चित्रपटही प्रदर्शित झाले. या चित्रपटांनाही तुफान प्रतिसाद मिळाल्याचं पहायला मिळालं. या चित्रपटांनाही अनेक विक्रम मोडीत काढले.