बाली : इंडोनेशियातील बाली द्वीपमधील माऊंट अंगुंग येथे ज्वालामुखीचा स्फोट होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे इंडोनेशियातील सर्व प्रकारच्या विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे 5,500 प्रवासी विमानतळारच खोळंबले आहेत. तर, ज्वालामुखी स्फोट झालेल्या परिसरातील सुमारे 24 हजार लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
बाली येथील गुगुरा राय आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते ए. आर. अय्यसन यांनी सांगितले की, द्वीपजवळील सर्व घरे खाली करण्यात आली असून, परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर, पुलू लंबोक आंतरराष्ट्रीय विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सर्व प्रकारच्या विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून, 5,500 प्रवासी विमानतळावरच अडकून राहिले आहेत. यात भारतीय प्रवाशांची संख्या मोठी असल्याचे समजते. मात्र, यात एकूण किती भारतीय प्रवाशांचा समावेश आहे हे समजू शकले नाही.
इंडोनेशियातील राष्ट्रीय अपत्ती निवारण समितीने म्हटले आहे की, अंगुग पर्वतावर शनिवारी तीन वेळा ज्वालामुखीची आग भडकली. आगीच्या ज्वाळा सुमारे 4,000 मीटर उंचीपर्यंत पोहोचत होत्या. समितीने म्हटले आहे की, ज्वालामुखीचा पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.30 च्या सुमारास झाला.