बिजिंग : आई - वडिलांच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म... कसं शक्य आहे हे... असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल... पण होय, हे खरं आहे. 'सरोगसी'च्या माध्यमातून एका चिमुरड्यानं आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी या जगात प्रवेश केलाय. चीनमध्ये एका सरोगेट आईनं या बाळाला जन्म दिलाय.
या बाळाच्या आई-वडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता. चीनी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, 2013 साली झालेल्या या दुर्घटनेत या दाम्पत्यावर प्रजननसंबंधी उपचार सुरू होते. दाम्पत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या भ्रुणाला जन्म देण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढलीय. या भ्रुणाला ननजिंगच्या पूर्वी शहरातील एका हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आलंय.
बिजिंग न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला 9 डिसेंबर रोजी लाओसच्या एका सरोगेट आईनं जन्म दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, चीनमध्ये सरोगसी अवैध आहे आणि त्यामुळेच या तांत्रिक पद्धतीनं मुलांची इच्छा असणाऱ्या जोडप्यांना परदेशात पर्याय शोधावे लागतात. या बाळाच्या आजी-आजोबांच्या अडचणी बाळाच्या जन्मानंतरही संपलेल्या नाहीत. या बाळाचं पितृत्व आणि नागरिकता मिळवण्यासाठी त्यांना अजून बऱ्याच कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतंय.
या बाळाला विमानानं आणण्याचा विचार त्यांनी केला परंतु, कोणत्याही एअरलाईन्सनं यासाठी तयारी दर्शवली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी या भ्रुणाला रस्तेमार्गावरून लाओसला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. लाओसमध्ये सरोगसी वैध आहे.