King Charles video : ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्वोच्च पदावर अर्थात राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स यांना राजेपद बहाल करण्यात आलं. किंग चार्ल्स यांनी सर्व सूत्र हाती घेताच संमिश्र प्रतिक्रिया देशभरात पाहायला मिळाल्या. परदेशातही सध्या अशाच काही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नुकतंच किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी क्वीन कॅमिला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असून, पाच दिवसांसाठी ते या दौऱ्यादरम्यान विविध नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या किंग चार्ल्स यांनी सपत्नीक स्थानिक संसदेत आयोजित करण्यात आलेल्या एका स्वागत समारंभामध्ये सहभाग घेतला. त्याचवेळी तेथील सेनेटर लिदिया थोर्प यांनी वसाहतवादाचा विरोध करणाऱ्या घोषणा केल्या.
'तू माझा राजा नाहीस... तु आमच्या माणसांचा नरसंहार केला आहेस. आमची जमीन, जागा परत दे, तू जे काही हिरावलंयस ते परत दे', असं त्या जीवाच्या आकांतानं ओरडू लागल्या. महिला खासदाराकडून होणारा विरोध पाहता किंग चार्ल्स यांनी फार काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, परिस्थिती चिघळताना पाहून तिथं असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी महिला खासदाराला पुढे जाण्यापासून अडवत कार्यक्रम स्थळावरून बाहेरचा रस्ता दाखवला.
सोमवारी कॅनबेरा येथील संसदेच्या ग्रेट हॉलमध्ये किंग चार्ल्स संबोधनपर भाषण देत असतानाच तिथं लिदिया यांनी विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. ब्रिटनच्या राजेशाहीविरोधात त्यांनी आवाज उठवला आणि सर्वांचं लक्ष वेधलं. लिदिया या त्यांच्या याच बेधजक स्वभावासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी 2022 मध्ये खासदारकीची शपथ घेत असताना राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याशी संबंधित शपथेतील काही संदर्भ वाचतान तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
WATCH: The King and Queen look on as Aboriginal Australian senator Lidia Thorpe shouts "You are not my King, you committed genocide against my people. "You destroyed our lands, this is not your land."
The senator was criticised in 2022 was calling Queen Elizabeth II a coloniser pic.twitter.com/UZdGd3P1S9— Russell Myers (@rjmyers) October 21, 2024
100 वर्षांहून अधिक काळासाठी ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटीशांच्या वसाहती होत्या. 1901 ला यापासून ऑस्ट्रेलियाला मुक्ती मिळाली, पण तरीही आजतागायत ऑस्ट्रेलिया पूर्णपणे स्वतंत्प नाही. आजही इथं संवैधानिक राजेशाही प्रचलित असून, त्याच्या प्रमुखपदी किंग चार्ल्स असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय हा देश ब्रिटनच्या कॉमनवेल्थचाही भाग असून, यामध्ये भारताचाही समावेश आहे. त्याव्यतिरिक्त या यादीत एकूण 56 देशांचा समावेश आहे.