Australia : तुम्ही खेकडे (Crab) हा समुद्रकिनाऱ्यावर पाहिले असतील, मात्र रस्त्यावर खेकडे पाहिलेत का? एक, दोन नाही... तब्बल 5 कोटी खेकडे रस्त्यावर आलेत. बरं.. हे काही साधे-सुधे खेकडेही नाहीयेत. हे खेकडे ते आहेत नरभक्षी लाल खेकडे (red crab). ऑस्ट्रेलियातल्या ख्रिसमस बेटावर (Christmas Island red crab) ही लाल खेकड्यांची जत्रा भरलीय.
दरवर्षी हे खेकडे जंगलातून निघतात आणि नॅशनल पार्कच्या तटावर जातात. या प्रवासात ते अनेक जंगलं पालथी घालतात, डोंगर चढतात आणि उतरतात. अगदी तीन मजली इमारतींवरही हे खेकडे चढू शकतात. त्यांचा प्रवास सुखकर आणि निर्विघ्न व्हावा, यासाठी ऑस्ट्रेलियातील अनेक रस्ते या संक्रमण काळात बंद केले जातात.
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात खेकड्यांचा हा प्रवास सुरू होतो. प्रजननासाठी ते समुद्र किनारा गाठतात. समुद्रकिनारी नर आणि मादा खेकड्यांचा संगम होऊन, तिथं खेकड्यांची नवी जमात पैदास होते. पुढील 5 ते 6 दिवसांत हे खेकडे समुद्रात जवळपास 1 लाख अंडी घालतील.
एका महिन्यानंतर, ही पिल्लं किनाऱ्याकडे आणि ख्रिसमस बेटाच्या जंगलाकडे जातील. समुद्रातील खेकड्यांची बहुतेक पिल्लं मासे आणि शार्क खातात. ख्रिसमसला ऑस्ट्रेलियाचा हा किनारा संपूर्ण लाल खेकड्यांनी भरलेला असतो. हे खेकडे पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी उसळते.