महिला पत्रकाराच्या त्या प्रश्नावर ट्रम्प संतापले, परिषद अर्ध्यातच सोडून गेले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली.

Updated: May 15, 2020, 08:35 PM IST
महिला पत्रकाराच्या त्या प्रश्नावर ट्रम्प संतापले, परिषद अर्ध्यातच सोडून गेले title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली. महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प चांगलेच संतापले. एवढच नाही तर ते पत्रकार परिषद सोडूनही गेले. सीबीएस न्यूजच्या पत्रकार वेजिया जियांग यांच्यासोबत ट्रम्प यांची बाचाबाची झाली.

कोरोना चाचण्यांमध्ये अमेरिका इतर देशांपेक्षा चांगलं काम करत आहे, असं तुम्ही वारंवार का म्हणत आहात? अमेरिकेत लोकांचे मृत्यू होत आहेत, तरी ही जागतिक स्पर्धा का? असा प्रश्न वेजिया जियांग यांनी ट्रम्प यांना विचारला.

वेजिया यांनी विचारलेल्या या प्रश्नाला ट्रम्प यांनी उत्तर दिलं. 'जगामध्ये कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. तुम्ही हा प्रश्न चीनला विचारला पाहिजे, मला नाही. हा प्रश्न चीनलाच विचारा,' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. 

वेजिया जियांग या अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिन राज्याच्या असल्या तरी त्यांचा जन्म चीनमध्ये झाला आहे. ट्रम्प यांच्या या उत्तरावर वेजिया जियांग यांनी प्रतिप्रश्न केला. तुम्ही मलाच हे का बोलत आहात? माझा जन्म चीनमध्ये झाल्यामुळे ट्रम्प यांनी असं उत्तर दिल्याचं जियांग यांना सुचवायचं होतं. मला कोणीही असा प्रश्न विचारला तरी मी हेच उत्तर देईन, असं ट्रम्प जियांग यांना म्हणाले. 

जियांग यांच्यासोबत झालेल्या वादानंतर ट्रम्प दुसऱ्या पत्रकाराकडे वळले, पण तरीही जियांग ट्रम्प यांना प्रश्न विचारत होत्या. ट्रम्प यांनी दुसऱ्या महिला पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगितला, पण या महिला पत्रकाराला प्रश्न विचारण्याची संधी न देता ट्रम्प पुढच्या पत्रकाराकडे गेले. पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारण्याआधीच ट्रम्प पत्रकार परिषद अर्ध्यात सोडून निघून गेले. ट्रम्प आणि जियांग यांच्यासोबतच्या वादानंतर ट्विटरवर आय स्टॅन्ड विथ वेजिया जियांग हा हॅशटॅग अमेरिकेमध्ये ट्रेन्डिंगमध्ये आला. 

अमेरिकेत १३.६७ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ८० हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचे ४१.८० लाख लोकांना कोरोना झाला आहे आणि २.८३ लाख लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.