Ukraine Dam Collapse: दीड वर्षांपासून सुरु असलेल्या युक्रेनविरुद्ध रशिया युद्धादरम्यान युद्धग्रस्त युक्रेनमध्ये एक नवीन संकट उभं राहिलं आहे. या नव्या संकटाच्या कचाट्यात तब्बल 42 लाख युक्रेनियन नागरिक अडकले आहेत. रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनच्या भागातील एका मोठ्या धरणाची (Dnipro River Dam) भिंत मंगळवारी (6 जून 2023 रोजी) फुटली. त्यामुळे या परिसरामध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. या मोठ्या धरणाची भिंत फुटल्याने 42 हजारांहून अधिक नागरिक संकटात अडकले आहेत. हजारो नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून ही भिंत फुटल्याने झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पही धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. हे धरण फुटल्याने भविष्यात रशियाने काही वर्षांपूर्वी ताबा मिळवलेल्या क्रिमिया प्रांतामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. रशिया व युक्रेनने या घटनेसाठी एकमेकांवर घातपाताचे आरोप केले आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही ही परिस्थिती दिवसोंदिवस अधिक गंभीर समस्या धारण करुन शकते अशी भीती व्यक्त केली आहे.
फेब्रुवारी 2022 पासून रशियाने युक्रेनवर सातत्याने हल्ले केले आहेत. युक्रेनचा बराचसा प्रदेश रशियाने ताब्यात घेतला आहे. रशियाने ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये नीपर नदीवरील काखोव्हका धरण आहे. याच धरणाची मोठी भिंत फुटली असून आहे. भिंत फुटल्याने या परिसरामध्ये एकच हाहाकार माजला असून फारच मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. धरणाची भिंत फुटल्यानंतर रशिया आणि युक्रेनचे नियंत्रण असलेल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी शिरले आहे. धरणफुटीमुळे युरोपमधील सर्वात मोठ्या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पामधील कुलिंग परिणाम होण्याची भीती आहे. धरणावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामधून 150 मेट्रिक टन तेलाची गळती झाली आहे. तसेच आगामी काही दिवसांमध्ये आणखी 300 मेट्रिक टन तेल नदीपात्रात मिसळण्याची भीती आहे.
या धरणाची भींत नेमकी कोणी फोडली यावरुन रशिया आणि युक्रेनने परस्परांवर आरोप करताना दिसत आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, रशियन सैन्याने धरणाच्या भिंतीमध्ये स्फोट घडवून आणल्याचा आरोप केला आहे. मात्र रशियाने हा दावा फेटाळून लावताना युक्रेनवरच धरणाची भींत फोडल्याचा आरोप केलाय. रशियन राष्ट्राअध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या क्रेमलिन या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हा युक्रेनने मुद्दाम घडवून आणलेला घातपात असल्याचा आरोप केला आहे.
या धरणाची भींत फुटल्याने 42 हजार लोकांचा जीव धोक्यात आला आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला फुटलेल्या धरणामुळे पुराचा सामना करावा लागणार आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या खेर्सन शहरामधील पाण्याची पातळी वाढली आहे. येथील अनेक लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. या शहरातील बहुतांश भागांमध्ये गुडघाभर पाणी भरलं आहे. येथील काझकोवा दिब्रोव्हा प्राणीसंग्रहालयातील 300 प्राण्यांची मृत्यू झाला आहे. फेसबुकवरुन यासंदर्भातील माहिती संग्रहालय प्रशासनाने दिली आहे.