America Snowstrom : अमेरिका नावाची सुपर पॉवर... पण निसर्गापुढं या महासत्तेला देखील गुडघे टेकावे लागले. अमेरिकेवर अक्षरशः स्नो अटॅक सुरू असून, 'बॉम्ब' नावाच्या या हिमवादळाच्या तडाख्यानं पार दैना उडाली आहे. बर्फाच्या वादळामुळे अमेरिका अशी काही गोठून गेलीय की, अनेक राज्यांमध्ये तापमान मायनस 45 डिग्री एवढं खाली उतरलंय. सततच्या बर्फवृष्टीचा मोठा फटका विमानसेवेला बसलाय. हजारो विमानं रद्द झाल्यानं ख्रिसमससाठी घरी जाणारे लाखो नागरिक विमानतळावर अडकून पडलेत.
बर्फाच्या तुफानाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसलाय. ख्रिसमसच्या सकाळी घराचा दरवाजा उघडला तेव्हा नागरिकांना घरासमोर बर्फाचा मोठा डोंगरच कोसळल्याचं जाणवलं. या बर्फानं अमेरिकन नागरिकांना अक्षरशः फ्रीज करून टाकलंय. या बॉम्ब सायक्लोनमुळं ठिकठिकाणी बर्फवृष्टी आणि तुफानी पाऊस सुरू आहे.
रस्तेही बर्फाने झाकले गेल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय. वीजपुरवठा खंडीत झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागतंय. अत्यावश्यक सेवा देखील ठप्प झाल्यात.
अमेरिका, कॅनडा आणि युरोपपाठोपाठ जपानला देखील हिमतुफानाचा जबरदस्त तडाखा बसलाय. जपानवर देखील स्नो अटॅक झाल्यासारखी परिस्थिती आहे. सगळीकडे पाहावं तिकडे बर्फाची पांढरीशुभ्र चादर पसरलीय. बर्फवृष्टीचा कहर एवढा आहे की, आतापर्यंत 14 हून अधिक लोकांचे बळी गेलेत. अनेक शहरांमध्ये पारा शून्याच्याही खाली उतरलाय. वीजपुरवठा खंडित झाल्यानं 10 हजाराहून अधिक घरांमध्ये वीज गायब झाली आहे. रस्ते, रेल्वे तसेच विमान वाहतूकसेवा ठप्प झालीय. घरातच कैद होण्याची पाळी जपानवासीयांवर आली आहे.
हिमतुफानाच्या या अस्मानी संकटाचा मुकाबला करताना अमेरिका, कॅनडा, जपान अशा प्रगत देशांची पार दैना उडाली आहे. निदान आता तरी ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्यावर अमेरिकेसारखी महासत्ता गांभीर्यानं विचार करेल, अशी आशा आहे. नाहीतर निसर्ग होत्याचं नव्हतं करायला मागेपुढं पाहणार नाही.