बेजबाबदार चीनमुळे जगावर मोठं संकट, 90 दिवसांत 90 कोटी लोकांना लागण?

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, नव्या व्हेरिएंटमध्ये सातत्याने बदल होत असल्याने कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची संशोधकांना चिंता

Updated: Dec 26, 2022, 08:37 PM IST
बेजबाबदार चीनमुळे जगावर मोठं संकट, 90 दिवसांत 90 कोटी लोकांना लागण? title=

Coronavirus Outbreak : चीनमध्ये (China) कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. चीनप्रमाणेच हा व्हेरियंट इतर देशांमध्येही पसरला तर काय? नुसत्या कल्पनेनं जगभरातील संशोधकांचा थरकाप उडालाय. या नव्या व्हेरियंटमध्ये सातत्यानं बदल होतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची चिंता संशोधकांना सतावतीय. 

90 दिवसात 90 खोटी लोकांना लागण?
चीनमध्ये ज्या पद्धतीनं रूग्णवाढ होतीय हे लक्षात घेता येत्या 90 दिवसात इथली 60 टक्के लोकसंख्या म्हणजेच जवळपास 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते असा दावा साथरोगतज्ज्ञ एरिक फिगल डिंग यांनी केलाय. या कालावधीत लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशीही भीती डिंग यांनी व्यक्त केलीय. तर साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं 1 ते 20 डिसेंबर दरम्यान चीनमध्ये तब्बल 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा केलाय. 

चीन सरकारकडून (China Government) मात्र अद्याप कोणतेही अधिकृत आकडे जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नव्या व्हेरियंटचं बदलतं रूप आणि चीनची लपवाछपी जगासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉनचा BF.7 (Omicron BF.7) या नवीन व्हेरियंटमध्ये (Variant) सतत बदल होत असल्यानं त्याचा अंदाज घेणं तुर्तास तरी अवघड आहे. शिवाय हा नवा व्हेरियंट कितपत घातक आहे याचे ठोस पुरावे हाती आलेले नाहीत. चीनमध्ये एका दिवसात 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दुप्पट तर उत्तरप्रदेशच्या लोकसंख्येपेक्षा काही कोटींनी जास्त आहे. 

कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीनची लपवाछपवी
कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीननं पुन्हा लपवाछपवी सुरु केलीये. यापुढे चीनच्या आरोग्यविभागाला रुग्णसंख्या जाहीर करता येणार नाहीत असा निर्णय चिनी सरकारनं घेतलाय. चीनच्या रुग्णसंख्येची माहिती ही रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच सीडीसीकडून जाहीर केली जाईल असं सांगण्यात आलंय. चीनच्या आरोग्य विभागाचा एक अहवाल लीक झाला होता. ज्यात एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर चीनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 

एका दिवसात सर्वाधिक संसर्गाचा विक्रम
जगामध्ये एका दिवसात सर्वाधिक लोकांना एकाच दिवशी झालेल्या संसर्गाचा विक्रम या चीनमधील करोनाच्या लाटेने मोडीत काढलाय. ओमिक्रॉनच्या BF.7 या सर्वात शक्तिशाली व्हेरिएंटमुळे चीनचं कंबरडं मोडलंय. चीनमधल्या कोरोनाच्या महाभयंकर लाटेचा परिणाम जपान आणि हाँगकाँगवर झालाय, तिथेही दिवसाला लाखांच्यावर रुग्ण मिळालायला लागलेत. तर दुसरीकडे जगात नाचक्की होऊ लागल्यानं चीनच्या जिनपिंग सरकारनं कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर करणं बंद केलंय.