कॉम्प्युटरपेक्षाही फास्ट! ऑटिझमवर मात करणाऱ्या 'या' मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त

Trending News : मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या बुद्धिपुढे आपण नगण्यच असतो. पण, याच शास्त्रज्ञांच्या IQ वर मात करणाऱ्या एका लहान मुलीनं सध्या नजरा वळवल्या आहेत. पाहा ती मुलगी आहे तरी कोण...   

Updated: May 11, 2023, 04:56 PM IST
कॉम्प्युटरपेक्षाही फास्ट! ऑटिझमवर मात करणाऱ्या 'या' मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त  title=
a young girl has higher iq than scientist albert einstein diagnosed with autism

Trending News : असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या रुपावरून त्याच्या किंवा तिच्या बुद्धिचातुर्याचा अंदाज कधीच लावू नका. अशा वेळी लावलेले तुमचे अंदाज 95 टक्के चुकीचेच ठरतात. कारण, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. तुम्हाला वर फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी कुठेतरी जत्रेमध्ये येऊन एखाद्या खेळण्यापुढे किंवा मग एखाद्या फोटोबुथपुढे उभी आहे, असंच वाटत असेल. प्रत्यक्षात मात्र तसं नाहीये. कारण, सध्या जगभरात याच मुलीची चर्चा सुरुये, किंबहुना तिच्या तल्लख बुद्धिनं सर्वांनाच हैराण करून सोडलंय. 

कोण आहे ही मुलगी? ती किती हुशार आहे माहितीये? 

मेक्सिको सिटी येथील अधरा पॅरेज सँचेज असं या मुलीचं नाव. वयाच्या तिसऱ्या वर्षी ती ऑटिझम अर्थात स्वमग्नतेनं ग्रासल्याचं निदान झालं होतं. शालेय जीवनापासूनच तिला अनेकांनी हिणवलं. वाईट बाब म्हणजे शिक्षकांचाही तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही फारसा सकारात्मक नव्हता. त्यामुळं एका नव्या आयुष्याची स्वप्न विणण्याच्या दिवसांत ती एकटी पडली होती. 

एक वेळ अशी आली, जेव्हा अधरानं स्वत:हूनच सोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांपासून दुरावा पत्करला. ती स्वत:ची स्वत: शिकत गेली आणि कमी वयातच तिनं Periodic Table आणि बिजगणिताचा अभ्यास केला. वयाच्या पाचव्या वर्षी एलिमेंट्री स्कूल आणि सहाव्या वर्षी तिनं मिडल आणि हायस्कूलपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 11 व्या वर्षी तिच्याकडे सिस्‍टम इंजीनियरिंगची बॅचलर्स पदवीही आली. आताच्या घडीला हीच अधरा मेक्सिकोच्या टेक्‍नोलॉजिकल यूनिवर्स‍िटीमध्ये गणित विषयावर पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. 

हेसुद्धा वाचा : Interesting! विमान उडवून कंटाळा आलाच तर, पायलट काय करतात? वाचून हैराण व्हाल 

 

अधरा इतकी हुशार आहे की तिचा आयक्यू 162 असून हा आकडा अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या आयक्यूपेक्षाही जास्त आहे. शाळेत जायच्या वयात ती इंजिनियरिंग क्षेत्रात मास्टर्स ही पदवी घेणार आहे. नासासाठी अंतराळवीर होण्याचं स्वप्न अधरा पाहतेय आणि त्या मार्गानं ती प्रयत्नही करताना दिसत आहे.

अधराची उंच भरारी घेण्याची स्वप्न.... 

भविष्यात अधराला अॅरिझोना विद्यापीठातून अॅस्ट्रोफिजिक्स विषयावर शिक्षण घेण्याची इच्छा आहे. सध्या ती मेक्सिकन स्पेस एजन्सीच्या मदतीनं Space Exploration आणि गणित विषयामध्ये लहान विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहे. अधराचं बुद्धिचातुर्य पाहता तिचं नासामध्ये काम करण्याचं स्वप्न फार कमी वेळातच साकार होऊ शकतं.