11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला

जेव्हा कधी माझं पोट दुखायचं, तेव्हा मी पेनकिलर घेत असे. पण अशाप्रकारे पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्याने हे दुखणं नंतर वाढत गेलं. यानंतर महिलेवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. नंतर जेव्हा तपासणी केली तेव्हा सत्य समोर आल्यानंतर महिलेला धक्का बसला.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2023, 06:11 PM IST
11 वर्षांपासून दुखत होतं पोट, रोजचं दुखणं समजून महिला करत होती दुर्लक्ष; MRI केला असता धक्काच बसला title=

रोजच्या व्यग्र आयुष्यात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. एखादं दुखणं असेल तर आपण तात्पुरता इलाज करतो. पण नंतर ही दुखणी पुढे जाऊन मोठी होतात आणि आपल्याच जीवाला धोके निर्माण करतात. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने तब्बल 11 वर्षं आपल्या पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर जेव्हा तिने MRI केलं तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला. पोट दुखू लागल्यानंतर महिला नेहमी पेनकिलर्स घ्यायची. पण जेव्हा हे दुखणं प्रमाणाबाहेर जाऊ लागलं तेव्हा ती रुग्णालयात दाखल झाली. यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. 

Mirror UK त्या वृत्तानुसार, हे प्रकरण कोलंबियामधील आहे. येथे 39 वर्षीय मारिया एडरलिंडो फोरियो नावाच्या महिलेच्या पोटातून सुई आणि घादा निघाला आहे. गेल्या 11 वर्षांपासून तिच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. नुकतंच तिने तपासणी केली असता पोटात सुई आणि धागा अडकला असल्याने पोटात वेदना होत असल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करत सुई, धागा बाहेर काढला आहे. 

मारियाला पोटात होणाऱ्या वेदना सर्वसामान्य वाटत होत्या. पण जेव्हा हे दुखणं असह्य होऊ लागलं तेव्हा ती डॉक्टरकडे गेली. तिथे MRI करण्यात आलं असता पोटात सुई आणि धागा असल्याचं आढळलं. 

मारियाने सांगितलं की, चार मुलांच्या जन्मानंतर तिने अजून मुलं होऊ नयेत यासाठी ऑपरेशन केलं होतं. पण या ऑपरेशन नंतर पोटात दुखू लागलं होतं. हे दुखणं कधी कमी तर कधी जास्त असायचं. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांनी पेनकिलर देत हे दुखणं थांबवलं, पण तिला पूर्णवेळ आराम मिळत नव्हता. 

कधीकधी या दुखण्यामुळे आपण रात्रभर झोपायचो नाही असं मारियाने सांगितलं आहे. 11 वर्षं आपण हे दुखणं सहन करत होतो असंही ती सांगते. पण अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय केल्यानंतर पोटदुखीचं खरं कारण समोर आलं.  

रिपोर्टनुसार, जेव्हा मारियाने आपल्या फॅलोपियन ट्यूबचं ऑपरेशन केलं होत, तेव्हा सुई-धागा डॉक्टरांकडून चुकून पोटातच राहिला होता. यामुळे इतकी वर्षं तिला त्रास सहन करावा लागला. पण आता ऑपरेशननंतर मारिया पुन्हा एकदा आयुष्याचा आनंद घेत आहे.