पत्नीची कर्तव्य पूर्ण करायची, मूलही जन्माला घालायचं; 63 वर्षीय पादरीने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याने खळबळ

पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून, तिची माहिती काढली आहे. मुलगी आणि तिची आई सध्या पोलिसांच्या सुरक्षेत आहे.  

शिवराज यादव | Updated: Apr 3, 2024, 03:57 PM IST
पत्नीची कर्तव्य पूर्ण करायची, मूलही जन्माला घालायचं; 63 वर्षीय पादरीने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न केल्याने खळबळ title=

घाना येथे एका 63 वर्षीय पादरीने 12 वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याने खळबळ उडाली आहे. पारंपारिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गबोरबू वुलोमो नुउमो बोरकेटे लावे XXXIII या पादरीने कथितपणे ओक्रोमो नावाच्या एका 12 वर्षाच्या मुलीशी शनिवारी लग्न केलं. लग्नात आलेल्या एका पाहुण्याने ही विवाह म्हणजे फार जुनी परंपरा असल्याचं सांगितलं आहे. ज्यानुसार पादरी एका अविवाहित मुलीशी लग्न करतो. त्सुरू, याला "गबोरबु वुलोमो" किंवा पारंपारिक ज्येष्ठ पादरी म्हणून ओळखलं जाते. नुंगुआ स्थानिक समुदायामध्ये त्यांचं फार महत्व आहे. 

घानामध्ये लग्नासाठी कायदेशीर वयाची वट 18 आहे. पण असं असतानाही हे लग्न लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लग्नात उपस्थित पाहुण्याने सांगितलं आहे की, नुंगुआ येथे 9 वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही अविवाहित मुलगी नाही. असंही सांगितलं जात आहे की, मुलगी जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हाच पादरीने तिची लग्नासाठी निवड केली होती.

लग्नाला समुदायातील अनेकजण उपस्थित होते. लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामध्ये लहान मुलगी साध्या सफेद कपड्यात दिसत आहे. दरम्यान यावेळी स्थानिक महिला मातृभाषेत बोलताना तिला पादरीच्या नावे चिडवत होत्या. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांनी तिला पत्नीच्या कर्तव्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला होता. तसंच पतीला आकर्षित करण्यासाठी त्यांनी तिला भेट दिलेले परफ्यूम वापरण्याचा सल्ला दिला होता.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर घानामधील अनेक नागरिकांनी विरोध केला असून, हे बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. काहींनी प्रशासनाकडे हे लग्न अमान्य करण्याची आणि पादरीची चौकशी कऱण्याची मागणीही केली आहे. 

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलगी लग्नानंतर पत्नीची सर्व कर्तव्यं पार पाडणार आहे. यामध्ये मूल जन्माला घालण्याचाही समावेश आहे. पण एकीकडे विरोध होत असताना समाजातील काही नेत्यांनी पादरीची बाजू मांडली आहे. लोकांना आमची परंपरा, संस्कृती माहिती नाही असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. 

त्यांनी पुढे म्हटलं आहे की, मुलीने वयाच्या सहाव्या वर्षी पत्नी होण्यासाठी आवश्यक विधी सुरू केले होते. परंतु या प्रक्रियेमुळे तिच्या शिक्षणात अडथळा आला नाही. काही रिपोर्टनुसार, मुलीला बाळंतपणासह वैवाहिक जबाबदाऱ्यांसाठी तयार करण्यासाठी दुसरा परंपरागत समारंभ पार पाडणे अपेक्षित आहे

पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून, तिची माहिती काढली आहे. मुलगी आणि तिची आई सध्या पोलिसांच्या सुरक्षेत आहे. घाना सरकारने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गर्ल्स नॉट ब्राइड्स या प्रतिष्ठित जागतिक स्वयंसेवी संस्थेच्या मते, घानामधील मुलींची लक्षणीय टक्केवारी प्रौढ होण्यापूर्वीच लग्न करते.