600 Killed In Few Hours: अल-कायदाच्या दहशतवाद्यांनी काही तासांमध्ये 600 लोकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे हत्याकांड ऑगस्ट महिन्यात घडलं असलं तरी त्याचा खुलासा आता झाला आहे. सदर हत्याकांड पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो (Burkina Faso) नावाच्या देशातील बार्सालोघो शहरात झाल्याचं शुक्रवारी समोर आलेल्या माहितीत म्हटलं आहे. दहशतवाद्यांपासून आपल्या शहराचा बचाव करण्यासाठी येथील लष्कराच्या आदेशावरुन स्थानिक लोक शहराभोवती खंदक खोदत असतानाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. पश्चिम आफ्रिकेतील या छोट्याश्या देशाच्या इतिहासात झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. या देशामध्ये मागील काही वर्षांपासून अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट्सच्या दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरी केली आहे. शेजारच्या माली देशामधून हे दहशतवादी 2015 पासून सातत्याने बुर्किना फासोमध्ये घुसखोरी करत आहेत.
अल-कायदाशी संलग्न असलेल्या जमात नुसरत अल-इस्लाम वल-मुस्लमीन (जेएनआयएम) ही दहशतवादी संघटना मालीमध्ये सक्रीय असून ते अनेकदा बुर्किना फासोमध्येही हल्ले करतात. अशाचप्रकारे त्यांनी गावबंदीचा आदेश जारी करत ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला बुर्किना फासोमधील बार्सालोघोमध्ये बाईक्सवरुन टोळ्या टोळ्यांनी प्रवेश केला.
संयुक्त राष्ट्रांनी बार्सालोघोमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 200 च्या आसपास असल्याचं म्हटलं आहे. तर जेएनआयएमने बार्सालोघोमधील 300 'फायटर्स'ची हत्या केल्याचं जाहीर केलं आहे. मात्र सीएनएनने, फ्रान्समधील सरकारमधील सुरक्षेसंदर्भातील विभागाचा संदर्भ देत 600 लोकांना गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
बार्सालोघोमध्ये लष्कराच्या सांगण्यावरुन स्थानिक लोक सुरक्षेसाठी खंदक खोदत असताना हा हल्ला घडल्याचं हल्ल्यातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितलं आहे. आपण बार्सालोघोपासून 4 किलोमीटरवर खंदक खोदण्याचं काम करत असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारस पहिल्यांदा गोळीबाराचा आवाज ऐकला असं या व्यक्तीने सीएनएनशी बोलताना सांगितलं. "मी स्वत:ला वाचवण्यासाठी त्या खंदकामध्येच लपून सरपटत असल्याप्रमाणे क्रॉलिंग करत पुढे सरकत राहिलो. मात्र हल्लोखोर या खंदकांमध्येच गोळीबार करत चालल्याचं दिसून आलं. त्यामुळे मी तिथून बाहेर आलो तर मला रक्तबंबाळ अवस्थेतील पहिला मृतदेह दिसला. मी जिथून जात होतो तिथे सगळीकडे रक्त सांडलं होतं. सगळीकडून केवळ किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्यामुळे मी झुडपांमध्ये लपून राहिलो. अगदी दिवस मावळल्यानंतर मी बाहेर आलो," असं या हल्ल्यात बचावलेल्या व्यक्तीने सांगितलं.
हल्ल्यातून वाचलेल्या अन्य एका महिलेने तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांना या हल्ल्यात गमावलं. तिने दिवसभर दहशतवादी येथील लोकांची हत्या करत होते असं सांगितलं. "आम्ही या हल्ल्यानंतर तीन दिवस केवळ मृतदेह गोळा करत होतो. सगळीकडे मृतदेह पडले होते. आमच्या मनात भितीने घर केरं आहे. दफनविधीच्या वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं मृतदेह होते की सर्वांचा दफनविधी करणं शक्य नव्हतं," असं बचावलेल्या महबिलेने सांगितलं.
बुर्किना फासोच्या लष्कराने स्थानिकांना दहशतवादी आणि घुसखोरांपासून वाचण्यासाठी शहराभोवती खंदक खोदण्यास सांगितलं होतं. मात्र दहशतवाद्यांनी आधीच स्थानिकांना लष्कराचं ऐकून खंदक खोदण्याचं काम स्वीकारु नये असा इशारा दिला होता. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या ओसामा बीन लादेनच्या अल-कायदाची उपसंघटना असलेल्या जेएनआयएम आणि इस्लामिक स्टेटने आतापर्यंत या देशातील 3800 लोकांची या वर्षभरात हत्या केली आहे.
बुर्किना फासोमध्ये 2015 पासून रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. या देशात तेव्हापासून आतापर्यंत 20 हजार जणांची हत्या झाली आहे. बुर्किना फासो हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश आहे.