कारमध्ये सापडला भारतीय वंशाच्या धनाढ्य व्यक्तीचा मृतदेह

या घटनेने सर्वत्र खळबळ 

Updated: Oct 3, 2019, 07:03 PM IST
कारमध्ये सापडला भारतीय वंशाच्या धनाढ्य व्यक्तीचा मृतदेह  title=
छाया सौजन्य- फेसबुक

कॅलिफोर्निया : भारतीय वंशाचे धनाढ्य व्यावसायिक, ५० वर्षीय तुषार अत्रे यांचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. सँटा क्रुझ कंट्री शेरीफ यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलेल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली. कॅलिफोर्निया येथील घरातून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 

अत्रे नेट आयएनसी नावाच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीची मालकी त्यांच्याकडे होती. १ ऑक्टोबरला त्यांचं अपहरण केलं गेल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे सफेद रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये जातानाच त्यांना शेवटचं पाहिलं गेलं होतं, अशी माहिती सँटा क्रुझ पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना ९११ या क्रमांकावर एक फोन आला होता. सोमवारी आलेला हा फोन अत्रे यांच्या घरातून करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ज्यानंतर याप्रकरणीचा तपास सुरु करण्यात आला. याच कारवाईदरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास सँटा क्रुझ येथील डोंगराळ भागात एक कार सापडली. ज्यामध्ये अत्रे यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक स्तरावर ही हत्या खंडणीच्या कारणावरुन केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.