लग्न म्हटलं की प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना काळजी घेत असतो. यावेळी त्याचं दिसणं, आर्थिक स्थिती, स्वभाव अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. दरम्यान, यावेळी दोघांच्या वयातील अंतरही महत्त्वाचं असतं. एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर वयात जास्त अंतर नसावं असं सांगितलं जातं. हे अंतर जास्तीत जास्त 10 वर्षांचं ठेवलं जातं. दरम्यान अमेरिकेत एका 24 वर्षीय तरुणीने तब्बल 85 वर्षांच्या वृद्धाशी लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचाच प्रत्यय अमेरिकेतील एका घटनेवरुन आला आहे. अमेरिकेतील मिसिसीपी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने आपल्यापेक्षा 61 वर्ष मोठ्या वृद्धाशी लग्न केलं आहे. मिरेकल पोग 85 वर्षीय चार्ल्स पोग यांच्याशी विवाहबंधनात अडकली आहे. 2019 मध्ये दोघांची भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि काही काळातच त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. चार्ल्स हे रिअल इस्टेट एजंट आहेत, तर मिरेकल नर्स आहे.
डेली एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, चार्ल्स यांनी 2020 मध्ये मिरेकलला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले असून वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. यापुढे जाऊन आपलं कुटुंब सुरु करण्याचा दोघेही विचार करत आहेत.
दरम्यान, मिरेकलने आपली लव्हस्टोरी शेअर करताना प्रेमात पडलो तेव्हा चार्ल्स यांचं वय किती आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असं सांगितलं आहे. पण आपल्याला त्यांच्यासोबत फार आपलेपणाची भावना वाटत होती. यानंतर दोघांमध्येही प्रेम झालं. एकदा मिरेकलने चार्ल्स यांना त्यांची जन्मतारीख विचारली होती. त्यावेळी मिरेकलला त्यांचं नेमक वय समजलं, पण वयामधील हे अंतर कधीच त्यांच्या प्रेमाला रोखू शकलं नाही.
मिरेकलने सांगितलं की "मी कधीच त्यांच्या वयाचा विचार केला नाही. त्यांचं वय 55 असो किंवा 100 वर्ष असो, मला फरक पडत नाही. मला वाटतं त्यांचं वय 60 ते 70 वर्ष असावं. कारण ते दिसण्यात अजूनही चांगले आहेत. तसंच ते नेहमीच अॅक्टिव्ह असतात".
"माझ्या आजोबांनी मला जर तू आनंदी असशील तर, मीदेखील आनंदी असेन असं सांगितलं. पण माझे वडील फार नाराज होते. ते या लग्नासाठी तयार नव्हते. त्यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी मला फार वेळ लागला. तुम्ही जर लग्नात आला नाहीत तर आपली मुलगी कायमची गमावून बसाल असं मी त्यांनी सांगितलं होतं. पण जेव्हा ते चार्ल्स यांच्याशी बोलले, तेव्हा ते लग्नासाठी तयार झाले," असं मिरेकलने सांगितलं आहे. दरम्यान चार्ल्स यांना कोणतंही मूल बाळ नाही आहे. सध्या हे दांपत्य आयव्हीएफच्या माध्यमातून आई-वडील होण्याचा प्रयत्न करत आहेत.