"ब्लाऊज"चं महत्व, सायली राजाध्यक्ष देतात खास टिप्स

साडी हा स्त्रियांच्या पेहरावातील अतिशय महत्वाची गोष्ट. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 20, 2017, 01:16 PM IST
"ब्लाऊज"चं महत्व, सायली राजाध्यक्ष देतात खास टिप्स  title=
Photo - Sayali Rajadhyaksha's Facebook Page

मुंबई : साडी हा स्त्रियांच्या पेहरावातील अतिशय महत्वाची गोष्ट. 

प्रत्येक स्त्री ही साडी नेसणं पसंत करते आणि त्यामध्ये ती छान देखील दिसते. हल्ली साड्यांमध्ये नवनवे ट्रेंड देखील आले आहेत. पण साडीबरोबर चोळी म्हणजे ब्लाऊज हा ट्रेंड देखील बदलत चालला आहे. अनेकदा असं होतं साडी खूप चांगली असते पण ब्लाऊजचा कपडा विरघळतो तर कधी फाटतो. अशा वेळी ती साडी फूकट गेली असं होतं नाही. त्यासाडीवर वेगळ्या लूकचा ब्लाऊज कसा आकर्षक दिसू शकतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे. हल्ली तसे ट्रेंड देखील आहेत. या अशाच ट्रेंड बद्दल आपल्याला खास टिप्स देत आहेत ब्लॉगर सायली राजाध्यक्ष. त्यांनी "साडी आणि बरंच काही" या त्यांच्या पेजवर ही माहिती दिलीली आहे. 

सायली राजाध्यक्ष यांच्या टिप्स : 

ब्लाउज चांगला नसेल तर साडीची मजाच जाते. ब्लाउज कसा आहे, तो कसा बसलाय यावर त्या साडीचं देखणेपण अवलंबून असतं. ब्लाउजच्या अनेक फॅशन्स येतात आणि जातात. पण काही पद्धती मात्र पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि त्या टिकल्याही आहेत.ब्लाउजचं सगळ्यात पहिलं रूप म्हणजे कंचुकी. एक कपडा उरोजांवरून घट्ट लपेटून त्याची पाठीमागे बांधलेली गाठ हे ब्लाउजचं पहिलं रूप. आम्रपाली किंवा शकुंतला यासारख्या पौराणिक व्यक्तिरेखा असलेल्या चित्रपटांमध्ये आपल्याला कंचुकीचे प्रकार बघायला मिळतात. कालानुरूप या कंचुकीत बदल होत गेले. मग आले ते स्लीव्हलेस ब्लाउजच्या स्वरूपातले ब्लाउज ज्यावर उत्तरीय घेतलं जायचं. त्यानंतर मग हळूहळू बंद गळ्यांच्या ब्लाउजची फॅशन आली. म्हणजे मागून बंद गळा आणि समोरून गोल, मटका किंवा व्ही गळा. हिंदी चित्रपटांचे चाहते असाल तर ब्लाउजमध्ये होत गेलेले बदल सहज जाणवतील. सुरूवातीच्या काळातल्या बंद गळ्यांच्या किंवा बोट नेकच्या ब्लाउजमध्ये मधुबाला काय कातिल दिसते! हीच फॅशन आता परत आली आहे.

याच फॅशनमध्ये थोडा बदल करून नूतननं जे ब्लाउज घातले ते तिला काय सुरेख दिसतात. बंद गळ्यांचे ब्लाउज आणि झिरझिरीत साड्या, नूतन अतिशय ग्लॅमरस दिसते. शिवाय तिचं कानातलं बघा, आजकालच्या फॅशनिस्टांनी तोंडात बोटं घालावीत इतकी  सुंदर दिसते ती. 

नंतरच्या काळात साधनानं स्लीव्हलेस ब्लाउजची फॅशन रूढ केली. मुळात तिची केशरचना, काजळ रेखलेले डोळे आणि तिचं मृदु बोलणं या सगळ्यामुळे तिची ही फॅशन तिला फारच शोभली. या गाण्यात तिचा एकूण गेटअप बघा. गळ्यातला चोकर, स्लीव्हलेस ब्लाउज, शिअर पोताची साडी अहाहा! मनोजकुमार घायाळ झाला नाही तरच नवल!

अजून एक ग्रेसफुल वेषभूषा (बहुतेकदा, कधीकधी भयानक केली आहेच) करणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. तिनं ब-याच बंगाली पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामुळे बंगाली साड्या आणि त्यावर फुग्याच्या बाह्यांची पोलकी हा तिचा पोशाख अनेक चित्रपटांमध्ये आहे. तिला तो शोभूनही दिसतो. मुमताजनं अनेकदा अतिशय वाईट पोशाख केलेला आहे. पण एका चित्रपटातल्या तिच्या वेशभूषेनं आणि अभिनयानंही ती कुठल्याकुठे गेली आहे. तो चित्रपट म्हणजे तेरे मेरे सपने. या चित्रपटात मुमताज जितकी सुंदर दिसली आहे तितकी ती दुस-या कुठल्याच चित्रपटात दिसली नाही असं माझं मत आहे. या चित्रपटातल्या तिच्या साड्या, तिचा मेकअप, जेव्हा ती गरोदर असते तेव्हाच्या तिचं रंगीत कुंकू, तिचं मंगळसूत्र, तिचं हलकं केशरी नेलपॉलिश, तिच्या बांगड्या सगळं काही ती गर्भवती आहे हे सूचित करणारं, अतिशय प्रसन्न. यातले तिचे ब्लाउज अतिशय साधे पण शोभणारे.(https://youtu.be/I4sUyrzLQJw

ब्लाउजचं फिटिंग कसं असावं हे शिकायचं असेल तर रेखाला बघावं. माझ्या मते साडी हा पोशाख इतका शोभणारी अभिनेत्री दुसरी नाही. सुरूवातीच्या चित्रपटांमध्ये बेढब दिसणा-या रेखानं प्रयत्नपूर्वक स्वतःला बदललं. तिनं अनेक चित्रपटांमध्ये साड्या नेसल्या. ती त्या सगळ्या साड्यांमध्ये सुरेख दिसली. म्हणजे तिनं दोन वेण्या घातलेला खूबसूरत असो की अंबाडा घातलेला बसेरा की मोकळे केस सोडलेला सिलसिला. ती अतिशय सुंदर दिसते. मला ती दोन चित्रपटांमध्ये साड्यांमध्ये विशेष भावली. एक म्हणजे घर. यात तिच्या सगळ्या सिंथेटीक साड्या आहेत, ज्या मला अजिबातच आवडत नाहीत. पण तिला त्या सुरेख शोभून दिसल्या आहेत. आणि साधे टू बाय टूचे ब्लाऊज. काय सेन्शुअस दिसते रेखा!

सिलसिलामध्ये रेखाच्या गजी सिल्कच्या साड्या आणि हॉल्टर नेकचे ब्लाउज तिला फार छान दिसले आहेत. शबाना आझमी ही अशीच एक साडी अत्यंत शोभून दिसणारी अभिनेत्री. शबानाचं वैशिष्ट्य म्हणजे तिनं कायम बंद गळ्यांचे ब्लाउज घातले. शबाना सांगते की तिनं तिच्या आईकडून फॅशन सेन्स घेतला आहे. शौकत आझमींचा फॅशन सेन्सही उत्तम आहे.

 

दीप्ती नवलचाही फॅशन सेन्स जबरदस्त होता. साध्या साड्यांमध्येही ती अतिशय गोड दिसायची. साथ-साथ, किसी से ना कहना, चष्मेबद्दूर या चित्रपटांमध्ये किती गोड दिसते ती.

डिंपलही साड्यांमध्ये फार सुरेख दिसायची. कारण तेच, तिचे ब्लाउज फार सुरेख असायचे. अजूनही असतात. आजच्या काळातल्या नंदिता दास, कोंकोणा सेन आणि राणी मुखर्जी या तिघींच्या साड्या, ब्लाउज आणि स्टाइल मला जास्त आवडते. गंमत म्हणजे या यांच्या चित्रपटांमध्ये साड्यांमध्ये कमी दिसतात. पण अनेक समारंभांना या तिघी आवर्जून साडी नेसतात. काही अतिशय चांगल्या अभिनेत्री, सुंदर दिसणा-या पण अजिबात फॅशन सेन्स नसलेल्या. साड्या कशा नेसाव्यात, ब्लाउज कसे घालावेत हे अजिबात न कळणा-या. त्यातली मुख्य माधुरी दीक्षित. अतिशय उत्तम अभिनेत्री, सुंदर दिसते. पण तिच्या करियरच्या सुरूवातीपासून आजतागायत तिला साड्या आणि ब्लाउज कसे घालावेत हे कळलेलं नाहीये. अपवाद फक्त मृत्युदंड या चित्रपटाचा. तशीच जयाप्रदा. श्रीदेवी मला फारशी आवडत नाही. हेमामालिनीचाही फॅशन सेन्स शून्य.

वर ज्या अभिनेत्रींच्या चांगल्या फॅशन सेन्सचा उल्लेख केलाय त्या सगळ्याजणींचे ब्लाउज नीट बघा. हे सगळे ब्लाउज उत्तम दिसतात कारण हे सगळे ब्लाउज साधे आहेत. त्यांना झगमगीत, झगझगीत टिकल्या, लेस लावलेलं नाहीये. त्यांचे गळे वेडेवाकडे नाहीयेत. त्याला नाड्या, छिद्रं नाहीयेत. ब्लाउज जितकं साधं तितकं ते चांगलं दिसतं. किंबहुना जितकं साधं तितकं सुंदर अशी माझी तर खात्रीच आहे. ब्लाउज शिवताना गळा नीट बसायला हवा. ब्लाउजचं फिटिंग नीट हवं. बाकी साधंच चांगलं दिसतं. फॅशन करायची असेल तर फक्त गळ्याच्या पॅटर्नमध्ये आणि बाह्यांच्या लांबीत करा. स्लीव्हलेस ब्लाउज उत्तम फिटिंगचं असेल तर ते सेन्शुअस दिसतंच. त्याला इतर काही करायची गरज नसते. मात्र स्लीव्हलेसचा कट उत्तम जमायला हवा. दंड फार जाड असतील, उंची कमी असेल किंवा हात फार बारीक आणि फार लांब असतील तर शॉर्ट स्लीव्हजचे ब्लाउज घालू नका. मध्यंतरी अशा बाह्यांची इतकी फॅशन आली होती की सगळ्या बायका तसेच ब्लाउज घालत होत्या. अशांना नेहमीच्या लांबीच्या बाह्यांचे ब्लाउज चांगले दिसतात. उंची चांगली असेल आणि हात लांब असतील तर कोपरांपर्यंतच्या बाह्यांचे ब्लाउज चांगले दिसतात. स्लीव्हलेस घालायचं असेल तर मध्यम उंची किंवा जास्त उंची असलेल्यांना चांगलं दिसतं. स्लीव्हलेस घालताना दंड फार जाड किंवा बारीक चांगले दिसत नाहीत. दंड घाटदार असतील तर स्लीव्हलेस चांगलं दिसतं.

मध्यम उंचीच्या, मध्यम जाडीच्या बायकांना शॉर्ट स्लीव्हजचे ब्लाउज चांगले दिसतात. मला स्वतःला कोप-यापर्यंतच्या लांबीचे ब्लाउज सगळ्यात जास्त आवडतात. स्लीव्हलेसही मला खूप आवडतं. पण मग ते व्यवस्थित स्लीव्हलेस हवं. पूर्ण खांदा झाकणारे, बंडीसारखे स्लीव्हलेस ब्लाउज चांगले दिसत नाहीत. ज्यांच्या खांद्याच्या हाडांचा आकार चांगला आहे, खांदे सुडौल आहेत, शिवाय दंडही सुडौल आहेत अशांना हॉल्टर नेकचे ब्लाउज चांगले दिसतात. बंद गळ्यांचे म्हणजे मागून बंद आणि समोरून मटका, गोल, व्ही असे गळे किंवा बोटनेक हे बहुतेक सगळ्यांना बरे दिसतात. जरासं जाड असाल तर साधं गोल गळ्याचं (मागून, पुढून) ब्लाउज चांगलं दिसतं. असा गळा बहुतेकांना बरा दिसतो. हल्ली समोरचा गळा बंद आणि मागे व्ही किंवा गोल गळा असेही ब्लाउज दिसतात ते फार छान दिसतात. वर म्हटलं तसं जितकं साधं तितकं चांगलं दिसतं. त्यामुळे ब्लाउज शिवताना साधे गळे (जसे की गोल, व्ही, चौकोनी, बोटनेक, पान, मटका) शिवा. Asymmetrical गळे शिवू नका. असे गळे फक्त पडद्यावर बघायला चांगले दिसतात. ब्लाउजला शक्यतो घुंगरं, नाड्या, चमकदार लेस, मणी, टिकल्या लावू नका. एखादं ब्लाउज असं शिवायला हरकत नाही. पण नेहमीच्या ब्लाउजला शक्यतो लावू नये. साध्या बारीकशा पायपिंगनंसुद्धा ब्लाउजला उठाव येतो. साडीच्या कपड्यांमध्ये काठ असतील तर त्याचा छानसा वापर करता येतो. काही ब्लाउज शिवताना फक्त बाह्या वेगळ्या कपड्याच्या केल्यात तर तेही चांगलं दिसतं. ब्लाउज जर साडीतल्या कपड्याचं शिवत नसाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

बहुतेकदा कॉन्ट्रास्ट रंग-डिझाइनचं ब्लाउज उठून दिसतं. पण अगदी सौम्य रंग असतील तर शक्यतो त्याच रंगाचं किंवा जवळच्या सौम्य रंगाचं ब्लाउज चांगलं दिसतं. उदाहरणार्थ पांढरी साडी असेल तर काळं किंवा हिरवं ब्लाउज घालण्यापेक्षा पांढरं, बेज, ऑफव्हाइट, सोनेरी, चंदेरी अशा रंगांचं ब्लाउज चांगलं दिसतं. साडी आणि ब्लाउजचा पोत शक्यतो एकसारखा असावा. म्हणजे सिल्क साडी असेल तर त्यावर पातळ कॉटनचं ब्लाउज अगदी वाईट दिसतं. सिल्कवर सिल्कच घाला. तसंच उलट आहे कॉटनची साडी असेल तर खण किंवा कॉटनचं ब्लाउज चांगलं दिसतं. खादी, लिनन अशा पोतांच्या साड्यांना खण किंवा खादी, कॉटन सिल्क अशा पोतांचे ब्लाउज चांगले दिसतात. सिंथेटीक साड्या मी नेसतच नाही. पण नेसत असाल तर त्या पोतावर जाईल असंच ब्लाउज निवडा. नेटच्या साड्यांवर नेटचंच ब्लाउज चांगलं दिसतं. मी स्वतः अशा साड्या नेसत नाही त्यामुळे मला त्यातलं फार कळत नाही. शेवटी, माझं नेहमीचंच म्हणणं. आपण करू ती फॅशन हे लक्षात ठेवा. सगळे करताहेत म्हणून कुठलीही गोष्ट करू नका. एखादी फॅशन आपल्याला फार आवडत असेल आणि आपल्याला ती बरी दिसत नसेल तरी एखादं ब्लाउज तशा प्रकारचं शिवायला हरकत नाहीच. कारण मन मारून अजिबात जगू नये. त्यामुळे एखादं ब्लाउज तसंही शिवा. आता साड्यांचा मोसम आहे. हवा जरा बरी आहे. या काळात मुंबई-पुण्यात साड्यांची खूप प्रदर्शनं येतात. छानशा साड्या घ्या. (छान साडी घ्यायला खूप खर्च करावा लागत नाही), त्यावर छान ब्लाउज घाला. चांगल्या अक्सेसरीज घाला. छान प्रसन्न दिसा. बघा स्वतःलाच किती छान वाटतं ते!