मुंबई : तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, आजारपण, आहार, ताण-तणाव, जीवनशैलीतील बदल यामुळे मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते.
मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिलेला दर २८ दिवसांनी मासिक पाळी येणं अपेक्षित असतं. मात्र अनेकदा हे चक्र बिघडतं. बऱ्याचदा मासिक पाळी लवकर आली अशी अनेक महिलांची तक्रार असते. असं झाल्यास महिला लगेच घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे धाव घेतात. मात्र अशा परिस्थितीत घाबरून न जाता मासिक पाळी लवकर येण्याची कारणं समजून घेतली पाहिजेत.
जर तुम्हाला थायरॉईड, पीसीओएस (पॉलिस्टिक ओवरी सिंड्रोम) असे आजार असतील तर मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते. कारण अशा परिस्थितीत शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते. त्यामुळे महिलांना अशी परिस्थिती आढळल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घ्यावी.
अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण डाएट फॉलो करतो. डाएट फॉलो केल्यामुळे मासिक पाळी येण्याच्या वेळेत फरक पडतो. डाएटमुळे जर तुम्ही अचानक वजन कमी केलं तर मासिक पाळी लवकर येऊ शकते.
गर्भनिरोधक गोळ्यांचा मासिक पाळीवर परिणाम होतो. जर या गोळ्यांच्या वेळा दोन किंवा तीन वेळा चुकवल्या गेल्या तर मासिक पाळी लवकर येण्याची शक्यता असते. शिवाय काही ठराविक प्रकारच्या औषधांमुळेही मासिक पाळी लवकर येऊ शकते.
जर तुम्ही वयाची चाळीशी ओलांडली असेल तर तो तुमचा रजनिवृत्तीचा काळ असतो. महिलांना रजोनिवृत्ती येण्याच्या अगोदरच्या काळात मासिक पाळीच्या चक्रात बदल जाणवतात. शिवाय पाळीच्या दिवसांत स्रावातही फरक जाणवतो. त्यामुळे रजोनिवृत्ती येण्याच्या काहीकाळ अगोदर महिलांना मासिक पाळी लवकर येते.
महिलांना असणाऱ्या मानसिक ताण-तणावामुळे देखील मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी मासिक पाळी लवकर आल्यास घाबरून जाऊ नये.