दिल्ली : कोरोनाने जगातील अनेक देशांमध्ये संकट निर्माण केलं. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलीआहे. आता वर्षभरात जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना लसीच्या परिणामांवरही संशोधन करताय.
सामान्यत: महिलांच्या मनात असा प्रश्न असतो की, कोरोना लसीचा मासिक पाळीवरही परिणाम होतो? किंवा लसीमुळे मासिक पाळीमध्ये काही बदल होतात? यासंदर्भात नुकतंच एक संशोधन प्रसिद्ध झालं असून, त्यात एक मोठा निष्कर्ष समोर आला आहे.
बुधवारी महिलांच्या मासिक पाळीवर कोरोना लसीचा काय परिणाम होतो यावर एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं. या संशोधनात 4000 हून अधिक अमेरिकन महिलांच्या शेवटच्या 6 मासिक पाळींबाबत माहिती घेण्यात आली.
यामध्ये असं दिसून आलं की, लस घेतल्यानंतर, महिलांची पुढील मासिक पाळी सामान्य वेळेपेक्षा एक दिवस उशिराने सुरू झाली होती. COVID-19 मात्र लस घेतल्यानंतर मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या दिवसांच्या संख्येत कोणताही बदल झालेला दिसून आला नाही.
युनिव्हर्सिटी ऑफ ऑर्गन हेल्थ अँड सायन्सचे डॉ. अॅलिसन एडेलमन म्हणाले की, काही महिलांनी त्यांच्या लसीचा डोसनंतर अनियमित मासिक पाळी किंवा मासिक पाळीच्या इतर बदलांबद्दल माहिती दिली.
संशोधक डॉ. एडेलमन यांच्या टीमने महिलांच्या मासिक पाळीची माहिती घेत नॅचरल सायकल्स नावाच्या अॅपमधील डेटाचं विश्लेषण केलं. या अॅपमध्ये मासिक पाळीचा कालावधी पहिल्या दिवसापासून पुढच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत मोजला जातो. डॉ. एडेलमन म्हणाले की, तणाव, आहार आणि व्यायामामुळेही तात्पुरते बदल होऊ शकतात.
एडेलमन यांनी संशोधनावर आधारित रिपोर्ट जाहीर केला. ज्यामध्ये मासिक पाळीच्या 24 ते 38 दिवसांची सायकल असलेल्या महिलांचा समावेश आहे. संशोधकांनी या अॅपच्या मदतीने लसीकरणापूर्वीच्या तीन सायकल्स आणि लसीकरणानंतरच्या तीन सायकल्सची माहिती घेतली. एकाच मासिक पाळीत लसीचे दोन डोस घेतलेल्या 358 महिलांच्या पुढील सायकलमध्ये, सरासरी दोन दिवसांचा बदल दिसून आला.