स्तनपान देणाऱ्या मातांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्या, केंद्राचा राज्यांना सल्ला

स्तनपान देणाऱ्या मातांसाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.

Updated: Jun 2, 2021, 03:39 PM IST
स्तनपान देणाऱ्या मातांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्या, केंद्राचा राज्यांना सल्ला title=

मुंबई : स्तनपान देणाऱ्या मातांसाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या कठीण काळात स्तनपान देणाऱ्या महिलांना घरातून काम करण्याची व्यवस्था असावी असा सल्ला केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार, कोरोनाच्या संकट काळात अशा नवमातांना बाळाच्या जन्माच्या तारखेनंतर कमीत कमी एका वर्षापर्यंत घरून काम करण्याची सुविधा देण्यात यावी. 

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना महामारीच्या या संकटात बाळाला स्तनपान देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सूचना करण्यात येते. या सूचनेनुसार, स्तनपान देणाऱ्या मातांना घरातून काम करण्यााची सुविधा देण्यात यावी. मातृत्व लाभ अभिनियम 2017 च्या कलम 5 अंतर्गत स्तनपान देणाऱ्या महिलांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्याची सूचना करण्यात आली आहे. 

या तरतुदीअंतर्गत, स्तनपान देणाऱ्या महिलांच्या कामाचं स्वरूप जर घरातून करण्यासारखं असेल तर प्रसूती रजेनंतरही वरिष्ठांसोबतच्या परस्पर संमतीने वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात येऊ शकते. कोरोनाच्या या कठीण काळात स्तनपान देणाऱ्या महिला आणि बालकांना होणारा संभाव्य धोका पाहता केंद्र सरकारने या सूचना दिल्या आहेत. 

राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनीही महिला कर्मचारी आणि नियोक्तांमध्ये कायद्याच्या कलम 5 बाबत जनजागृती करण्यासाठी पावलं उचलावी अशी विनंती मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.