बारामतीमध्ये अजित पवारांची 'दादागिरी'; सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

धनगर समाजाचे गोपीचंद पडाळकर अजितदादांपुढे कडवे आव्हान उभे करतील, अशी आशा भाजपला होती.

Updated: Oct 24, 2019, 02:42 PM IST
बारामतीमध्ये अजित पवारांची 'दादागिरी'; सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त title=

बारामती: पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांनी आपल्या सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून दिमाखदार विजय मिळवला आहे. अजित पवार यांनी तब्बल १ लाख ३३ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील गोपीचंद पडाळकर त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करतील असा दावा भाजपकडून केला जात होता. मात्र, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच प्रत्येक फेरीत आघाडी घेत अजितदादांनी हा दावा सपशेल खोटा ठरवला.

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे फायरब्रॅण्ड नेते मानले जातात. बारामती मतदारसंघात धनगर समाजाचे संख्याबळ असल्याने ते अजित पवारांना शह देतील, असा भाजपचा अंदाज होता. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने वंचित बहुजन आघाडीतून पडाळकर यांना आपल्याकडे खेचून घेतले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गोपीचंद पडाळकर म्हणजे आपला ढाण्या वाघ असल्याचे म्हटले होते. त्यांच्यासाठी भाजपची प्रचारयंत्रणाही कामाला लावण्यात आली होती. मात्र, अजितदादांनी त्यांची डाळ अजिबात शिजू दिली नाही.

सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पराभवाच्या छायेत

आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच अजित पवार यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी सातत्याने वाढवत नेली.  २०१४ मध्ये गोपीचंज पडळकर भाजपाच्या तिकीटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर २०१९ लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. यावेळी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट बारामतीमधून उमेदवारी देऊ केली होती. मात्र, ते अजित पवार यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकले नाहीत. 

धनंजय मुंडेंकडे मोठी आघाडी

१९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. गेल्या ५० वर्षात बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करु शकलेला नाही.