पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्तानाट्यात निर्णायक क्षणी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडली होती. यानंतर प्रथमच हे दोन्ही नेते सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र दिसून आले. यावेळी अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्यांनी म्हटले की, फडणवीस व मी कार्यक्रमासाठी एकत्र येणार म्हटल्यावर लगेच ब्रेकिंग न्यूज झाली. चंद्रकांत पाटील येणार असल्याचं कोणाला माहिती नव्हते, नाहीतर त्यांचेही नाव आले असते. राजकीय भूमिका आणि मते वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळे विसरुन जावे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.
तर देवेंद्र फडणवीस यांनीही कोरोनाची लढाई एकत्रितपणे लढण्याची गरज व्यक्त केली. राज्यात दररोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. यापैकी २० टक्के रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. पुणे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांचे प्रमाण वाढले. या सर्वांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बाणेर येथे २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते झाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात जंबो रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्याखालोखाल क्षमता असलेले रुग्णालय बाणेर येथे सहामजली इमारतीत उभे करण्यात आले आहे. या रुग्णालयात ३१४ खाटा असून, २७० ऑक्सिजनसज्ज खाटा आणि ४४ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.