पुणे: पुण्यातल्या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येतय. गेले काही दिवस धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरुय. त्यामुळे धरणसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत तसेच खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणात मिळून ५९.७६ % पाणीसाठा झालाय.
टेमघर धरण ४६.९१%, पानशेत ७३.४८, वरसगाव ४६.०८% तर खडकवासला धरण ९९.१६ % भरलंय. गेल्यावर्षी आजच्या तारखेला या सर्व धरणांत मिळून ३८.५९% म्हणजे ११.२४ टीएमसी इतका साठा होता. यावर्षी या धरणांमध्ये १७.४२ टीएमसी म्हणजेच ५९.७६ % पाणीसाठा झाला आहे. धरणसाखळीतलं खडकवासला धरण सर्वात लहान आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिला तर सगळी धरणं लवकरच भरतील. पुणेकर आणि लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी आहे.