Nagpur Bjp Office Bearer Sana Khan: नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी सना खानची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनाच्या हत्येमधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. सनाची हत्या करुन तिचा मृतदेह हिरन नदीमध्ये फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या जबलपूर पोलीस करत असून सनाची हत्या तिचा मित्र अमित साहूचा नोकर जीतेंद्र गौडने केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सना खानची हत्या झाल्याच्या वृत्ताला नागपूर पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. सना खान ही 1 ऑगस्टपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर गेल्यानंतर बेपत्ता होती.
1 ऑगस्ट रोजी सना जबलपूरमधील तिचा मित्र अमित ऊर्फ पप्पू साहूला भेटण्यासाठी गेली होती. सना ही अमितच्याच घरी मुक्कामी होती. अमित हा तेथील एका ढाब्याच्या मालक आहे. अमित आणि सना यांच्यात जवळचे संबंध होते. अमित साहूची पती पोलीस दलात कामाला आहे. तिला या दोघांच्या नात्याबद्दल संशय होता. 2 ऑगस्टच्या दुपारपासून सनाने कुटुंबियांशी कोणताही संपर्क न साधल्याने तिच्या आईने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
सनाच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर मानकापूर पोलिसांचे पथक तपासासाठी जबलपूरमध्ये दाखल झालं. मानकापूर पोलिसांचं पथक शहरात आल्याचं समसल्यानंतर अमित साहू फरार झाला. आपल्या ढाब्याला कुलूप लावून त्याने शहरातून पळ काढला. साहूच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकरांनीही शहरामधून पळ काढल्याचं पोलीस तपासादरम्यान स्पष्ट झालं. अगदी ढाबा बंद करुन कर्मचाऱ्यांसहीत मालक अमित साहूसुद्धा बेपत्ता झाल्याने सना बेपत्ता होण्याचं कनेक्शन नक्कीच साहूशी आहे याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अमितच्या ढाब्यावर काम करणारा त्याचा नोकर जीतेंद्र गौडला अटक केली. जीतेंद्रने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला. 'अमितच्या कारच्या डिक्कीमध्ये सांडलेलं रक्त मीच साफ केलं होतं' असं जीतेंद्रने पोलिसांना सांगितलं. 'सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकला' असंही जीतेंद्रने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाब नोंदवताना सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं आहे. आरोपी जीतेंद्रला गोराबाजार-जबलपूर पोलिसांनी अटक केली. असून अद्याप अमित पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलीस ठाणेदार शुभांगी वानखडे यांनी सनाचा मृतदेह मिळेपर्यंत तिची हत्या झाली आहे असं म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. जोपर्यंत सनाचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत तिची हत्या झाली असे म्हणता येणार नाही. मात्र नोकराने दिलेल्या माहितीवरून सनाची हत्या झाल्याचं स्पष्ट होत आहे, असं वानखडे म्हणाल्या. मागील अनेक दिवसांपासून सना बेपत्ता असल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु होती. आता ही माहिती समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.