पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: भारतामधील आघाडीचे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीला मागील दोन आठवड्यांमध्ये लाखो कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हिंडनबर्ग रिपोर्टमुळे (Hindenburg Report) अदानी समुहाला मोठा फटका बसला आहे. अदानी समुहाने आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. मात्र नागपूरमधील (Nagpur) एका भविष्यकाराने 6 महिन्यांपूर्वीच याबद्दलच भाकीत केलं होतं. या भविष्यकाराचं नाव आहे अमित विभूते. सध्या सोशल मीडियावर अमित विभूतेंच्या या भाकीताची चर्चा आहे. मात्र या भाकीतासंदर्भात त्यांनी 'झी 24 तास'बरोबर बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे.
24 जानेवारी रोजी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकाशित झाला. मात्र मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्येत अमित विभूतेंनी यासंदर्भात भाकीत व्यक्त केलं होतं. फक्त यांनी थेटपणे कोणत्याही उद्योजकाचा थेट उल्लेख केला नव्हता. फेसबुकवर वॉर्निंग्स अॅण्ड अलर्ट्स नावाचा ग्रुप असून या ग्रुपवर विभूते यांनी व्यक्त केलेल्या या भाकीतावर आता हिंडनबर्ग रिपोर्टनंतर चर्चा सुरु झाली आहे. 17 ऑगस्ट 2022 रोजी अमित विभूते यांनी या ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. फेब्रुवारी 2023 पासून मोठी आर्थिक पडझड सुरु होईल, असं विभूते म्हणाले होते. एका देशातील मोठ्या व्यापाऱ्याचे अधिपतानाला सुरवात होईल आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल असा स्पष्ट उल्लेख या पोस्टमध्ये होता.
"ज्योतिषीशास्त्र हे पुरातन असलं तरी त्याला एक मर्यादा आहे. त्यामुळे ज्योतिष्यशास्त्राबरोबर वैज्ञानिक डेटा पर्यावरणाचा अभ्यास भूगर्भाचा अभ्यास तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासावरून पुढील होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याच अभ्यासाला ज्योतिष्यशास्त्राची सांगड घालून हे भाकीत मांडता येऊ शकते असं विभूते सांगतात. विभूते भाकीत करताना हा अभ्यास आहे. 100 % असे घडेलच असे नाही, असंही ते सांगतात.
अशाप्रकारे भाकित सांगण्यामध्ये लोककल्याणाचा उद्देश असल्याचं विभूते सांगतात. यामागील उद्देश एवढाच आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडीमुळे लोकांचं फार नुकसान होऊ नये. हे असं नुकसान जर मी थांबवू किंवा कमी करू शकलो तर खऱ्या अर्थाने या अभ्यासाचा फायदा होईल असंही अमित विभूते सांगतात. सामाजहिताच्या उद्देशाने मी हा अभ्यास करत आल्याचं अमित विभूते बोलून दाखवतात.
तसेच विभूते यांनी 2022 साली 23 फेब्रुवारी रोजी सत्तांतरणासंदर्भातील भाकीत केलं होतं. सत्तांतर होऊन पुन्हा युतीचं सरकार येईल असा इशारा विभूतेंनी दिला होता. यानंतर पाच महिन्यांनी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं.