लगेच येतो सांगून गेला, पण आलाच नाही.. अखेर, सिमकार्डने लावला असा शोध

दोन दिवस झाले तो घरी परतला नाही. त्याचा फोनही बंद होता. अखेर त्याच्या घरच्यांनी... 

Updated: Apr 20, 2022, 06:43 PM IST
लगेच येतो सांगून गेला, पण आलाच नाही.. अखेर, सिमकार्डने लावला असा शोध title=

डोंबिवली : मंगेश पाटील हा 26 वर्षीय युवक लोढा पलावा ईथल्या घरातून निघाला. दोन दिवस झाले तो घरी परतला नाही. त्याचा फोनही बंद होता. अखेर त्याच्या घरच्यांनी डायघर पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

डायघर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. मंगेश याच्या मोबाईलवर आलेले नंबर तपासून पाहिले. त्यात त्यांना एक मोबाईल नंबर संशयास्पद वाटला. त्या नंबरवरून केवळ मंगेशच्या मोबाईलवरच कॉल केले होते. 

त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने माग काढला आणि त्यांनी कळवा येथील प्रवीण जगताप याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीमधून एका खुनाचा उलगडा झाला.

प्रवीण याने मंगेश याला मुरबाड येथे नेऊन त्याच्या गळयावर धारदार सुऱ्याने वार करून ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरून पुरावा नष्ट केल्याची माहिती प्रवीणने दिली. आपल्या कबुली जबाबात प्रवीण याने मंगेश याचा खून करण्यासाठी सख्या चुलत भावाने 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याची कबुली दिली.

जमिनीच्या कामासाठी सही देत नाही म्हणून चुलत भावानेच सुपारी दिली असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने हा तपास करत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून दोन आरोपींना गजाआड केले. प्रवीण जगताप आणि राहुल सूर्यवंशी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय याला चौकशीअंती अटक करणार असल्याची माहिती दिलीय.