ठाणे: दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा आणि औरंगाबादेतून अटक केलेल्या दहा तरुणांनी मुंब्रेश्वराच्या मंदिरातील महाप्रसादात विष कालवण्याचा कट आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसने या दहा जणांविरोधात बुधवारी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे या सर्वांचा दाईश या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. ही संस्था वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईकशी संबंधित असल्याचा संशय आहे.
चारशे वर्ष जुन्या मुंब्रेश्वर मंदिरात डिसेंबर महिन्यात श्रीमद भागवद् कथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाप्रसादात विष कालवण्याचा कट या सर्वांनी आखला होता. तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिक या कटाचा सूत्रधार होता. मात्र, त्यादिवशी मंदिरात मोठ्याप्रमाणावर भाविक आल्याने त्यांचा हा कट फसला, अशी कबुली त्यांनी दिली आहे.
अबू हमजा हा या टोळक्याचा म्होरक्या असून त्याने मुंब्रा बायपास रोडच्या परिसरात सर्वांना स्फोटाचे प्रात्यक्षिकही दाखवले होते. हमजा आणि पोतरिकला या कामात मोहसीन खान उर्फ अबू मोर्या, अताई वारीस अब्दूल रशीद शेख उर्फ मझहर शेख, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, जम्मन खुठेऊपाड उर्फ अबू किताई, सलमान खान उर्फ अबू उबेदा आणि फरहाद अन्सारी यांनी साथ दिल्याचे एटीएसने म्हटले आहे. हे सर्वजण मुंब्रा आणि औरंगाबादचे रहिवासी आहेत. एटीएसने या सर्वांना जानेवारी महिन्यात ताब्यात घेतले होते.