मुंबई : टिकटॉक (TikTok) आणि इंस्टा रीलनंतर (Insta Reel) जगातील सर्वात मोठा व्हिडिओ तयार करणारा प्लॅटफॉर्म युट्यूबने (YouTube) शॉर्ट व्हिडिओच्या जगात प्रवेश केलाय. आता युजर्स युट्यूबवर 15 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करु शकतील. YouTube चे हे पाऊल छोटे व्हिडिओ बनविणार्या सर्व परफॉर्मर्ससाठी आव्हानापेक्षा कमी नसेल.
तुम्हाला YouTube Shorts वापरण्यासाठी कोणतेही वेगळे ऍप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. हे एकाच व्यासपीठावर उपलब्ध आहे. तुम्हाला केवळ प्ले स्टोअर किंवा Apple स्टोअर वरून यूट्यूब ऍपचे नवे वर्जन डाऊनलोड लागेल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूट्यूब शॉर्ट्सवर दोन प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जाऊ शकतात. प्रथम कॅमेरा साधनं वापरून 15 सेकंदांचा व्हिडिओ तयार करुन शेअर केला जाऊ शकतो तर दुसरे म्हणजे 60 सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करुन त्याच्या टायटल आणि डिस्क्रिप्शनमध्ये #Shorts असं लिहीणं.
व्हिडिओ अपलोड केल्यानंतर युजर्सला होमपेजवरील शॉर्ट्स व्हिडीओ शेल्फमध्ये दिसतील. हे व्हिडीओ YouTube ऍप आणि इतर बर्याच ठिकाणी दिसतील. पण शॉर्ट्स कॅमेरा अपडेट मिळाला आहे की नाही ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. युट्यूब ओपन करा आणि '+' चिन्हावर क्लिक करा. तुम्हाला 'शॉर्ट्स व्हिडिओ बनवा' हे ऑप्शन दिसत असेल तर तुमच्याकडे शॉर्ट्स कॅमेर्याचा एक्सेस आहे अन्यथा नाही.
माहितीनुसार, आज जवळपास 60 कोटी भारतीयांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असून ज्यामध्ये युट्यूब इनबिल्ड आहे. हा आकडा सतत वाढतोय. पुढच्या वर्षापर्यंत हा आकडा 75 कोटींच्या पुढे जाऊ शकेल असं म्हटलं जातंय. म्हणजेच, युट्यूबचे वापरकर्ते इंस्टाग्रामच्या १० कोटी एक्टीव्ह युजर्सपेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत. यावरुन तुम्ही यूट्यूबची मार्केट पोझिशन आणि व्यवसायाची कल्पना करु शकता.