WhatsApp Scam Link: व्हॉट्सअॅपवर दररोज नवनवीन घोटाळे उघडकीस येतात. यात जर चुकून एखादा युजर अडकला तर डोळ्याची पापणी लवेपर्यंत त्याचे अकाऊंट रिकामी झालेले असते. अशाच एका घोटाळ्याने डोके वर काढले आहे. तो व्हॉट्सअॅप पिंकच्या नावाने सध्या खळबळ उडवली आहे. यूजर्सना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप पिंक तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते.
बहुतेक लोकांना याबद्दल कोणतीही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही देखील त्यांच्या जाळ्यात अडकून सर्व काही गमावू शकता. तुमच्यासोबत असे काहीही होऊ नये, हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला या घोटाळ्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
स्कॅमर युजर्सना एक लिंक पाठवतात आणि त्यांना ''व्हॉट्सअॅप पिंक' डाउनलोड करण्यास सांगितले जाते. असे केल्यास तुमच्या अॅपला नवीन रूप मिळेल अशी आशा दाखवली जाते. युजर्सनी त्या लिंकवर क्लिक केल्यास त्याच्या खात्यातून मोठी रक्कम गायब होऊ शकते.
या घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अलीकडेच इशारा दिला आहे. लोकांना या नवीन फसवणुकीबद्दल सूचना देण्यात आली आहे. कोणीही हे अॅप डाउनलोड करू नका किंवा अशा लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन करण्यात आले आहे, असे पोलिसांनी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.