एक काळ असा होता जेव्हा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्यासमोर ती वस्तू हाताळून पाहिल्याशिवाय ती खरेदी केली जात नसे. पण जसजसं तंत्रज्ञान विकसित होतं गेलं आणि काळ बदलत गेला, आपल्याला बसल्या जागी अनेक गोष्टी मिळू लागल्या. Amazon-Flipkart अशा अनेक ई-कॉमर्स वेबसाईट्मुळे तर आता लोक खरेदी करण्यासाठीही बाहेर पडत नाहीत. माचीसपासून ते टीव्हीपर्यंत सगळं काही ऑनलाइन मिळतं. पण एकीकडे या फायद्यासह त्याच्यासह येणारे धोकेही तितकेच आहेत.
ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्स वेबसाईट्स बँक ऑफर आणि एक्स्चेंज बोनस देत असतात. या सर्व ऑफर्सनंतर तुम्हाला बेस्ट डिल दिली जाते. याशिवाय तुम्हाला ही वस्तू स्वत:हून घरी नेण्याची चिंता नसते. कारण ई-कॉमर्स वेबसाईट तुम्हाला घराच्या दरवाजापर्यंत वस्तू आणून देतात.
काहींसाठी असणारी ही सोय अनेकांना मात्र वाईट देणारी असते. याचं कारण त्यांना ऑर्डर केलेल्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू दिली जाते. यानंतर मग ती परत करण्यासाठी करावा लागणारा खटाटोप हा डोकेदुखी वाढवणारा असतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचं हे समजून घ्या....
एखादी वस्तू विकत घेतानाच तुम्ही सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. कंपन्या तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय देतात. हा पर्याय निवडल्यानंतर डिलिव्हरीवेळीच तुम्हाला बॉक्स उघडून दाखवला जातो. पण हा पर्याय निवडल्यानंतरही तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
जेव्हा बॉक्स उघडला जात असेल तेव्हा त्याचा व्हिडीओ शूट करा. जेणेकरुन तुम्हाला खराब किंवा चुकीची वस्तू मिळाली असेल तर ती परत करताना त्रास होणार नाही. फोटो काढण्यापेक्षा व्हिडीओ काढणं जास्त चांगला पर्याय आहे.
तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरुन वस्तू खरेदी केली आहे, त्यांच्या कस्टमर केअरशी संपर्क साधाला. यासाठी तुम्हाला त्या अॅप किंवा वेबसाईटवर लॉग-इन करावं लागेल आणि हेल्पमध्ये जाऊन तक्रार दाखल करावी लागेल. तुम्ही ई-मेल करतही तक्रार करु शकता. यावेळी पुरावा म्हणून सोबत व्हिडीओ जोडायला विसरु नका.
जर तुम्ही तक्रार करुनही कंपनी उत्तर देत नसेल तर तुम्ही सोशल मीडियावरुन याविरोधात आवाज उचलू शकता. सध्या सर्वच कंपन्या सोशल मीडियावर सक्रीय असात. त्यामुळे त्या ब्रँड्सची बदनामी होऊ नये यासाठी लगेच उत्तर देतात. पण यानंतरही जर कंपनी ऐकत नसेल तर मग ग्राहक मंचाकडे तक्रार करु शकता.
सरकारने ग्राहकांच्या मदतीसाठी अनेक पर्याय दिले आहेत. https://consumerhelpline.gov.in/ वर जाऊन तुम्ही तक्रार दाखल करु शकता. किंवा तुम्ही थेट ग्राहक मंचावर जाऊन तक्रार देऊ शकता.
ही सुविधा SMS, NCH अॅप आणि UMANG अॅपवर आहे. तक्रार करण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागेल. यानंतर तुम्हाला कागदपत्रं अपलोड करावी लागतील. तुम्ही तुमची तक्रार ट्रॅकही करु शकता.