वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहा आणि कमवा ७० लाख रुपये!

विटॅमिन वॉटरनं 'स्क्रोल फ्री फॉर अ ईअर' नावाची स्पर्धा सुरू केलीय

Updated: Dec 21, 2018, 02:37 PM IST
वर्षभर स्मार्टफोनपासून दूर राहा आणि कमवा ७० लाख रुपये! title=

मुंबई : एखाद्या दिवशी चुकूनही आपला स्मार्टफोन घरी राहिला तरी आपला संपूर्ण दिवस कसानुसा जातो. अशावेळी तुम्हाला जर कुणी स्मार्टफोनशिवाय राहायला सांगितलं तर... तर कदाचित एका तासासाठीही स्मार्टफोनपासून दूर राहणं तुमच्या जीवावर येईल... पण, याच स्मार्टफोनपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला कुणी पैसे देत असेल तर... तर कदाचित तुम्ही याचा विचार करू शकाल. मग करा की, कारण खरंच एक कंपनी तुम्हाला स्मार्टफोनपासून दूर राहण्यासाठी तब्बल ७० लाख रुपये देण्यासाठी तयार आहे.

स्मार्टफोनपासून दूर राहण्याची स्पर्धा

'कोका कोला'ची सहकारी कंपनी विटॅमिन वॉटरनं 'स्क्रोल फ्री फॉर अ ईअर' नावाची स्पर्धा सुरू केलीय. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला १,००,००० डॉलर म्हणजेच जवळपास ७० लाखांचं बक्षीस मिळणार आहे. 

ही स्पर्धेचे नियम फार कठिण नाहीत... तुम्हाला केवळ तुमच्या स्मार्टफोनपासून वर्षभर दूर राहायचंय... वर्षभर स्मार्टफोनचा वापर करायचा नाही. कंपनीनं आपल्या मार्केटिंग कॅम्पेनसाठी स्मार्टफोन युझर्सना टार्गेट केलंय. 

स्मार्टफोनचा वापर संपूर्ण: सोडणाऱ्या युझरला कंपनीकडून एक लाख डॉलर्सचं बक्षीस मिळणार आहे.

लॅपटॉप, डेस्कटॉपचा वापर करण्याची मुभा

या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तुमचा व्यवसाय किंवा नोकरी बंद पडेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचीही काळजी कंपनीनं घेतलीय. कारण, तुम्हाला पूर्ण वर्षभर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करण्याची मुभा कंपनीनं दिलीय. याशिवाय तुम्ही गूगल होम किंवा अमेझॉन अलेक्सा यांसारख्या स्मार्ट डिव्हाईसचा वापर करू शकाल. या स्पर्धेच्या कालावधी दरम्यान तुम्हाला केवळ स्मार्टफोन किंवा टॅबलेटचा वापर करता येणार नाही.

कसं आणि कुठे कराल रजिस्ट्रेशन?

'लायडिटेक्टर टेस्ट'च्या माध्यमातून तुम्ही वर्षभर स्मार्टफोनचा वापर केला किंवा नाही हे कंपनीला समजणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही ८ जानेवारी २०१९ पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकाल.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला वर्षभर स्मार्टफोनचा वापर करणार नाही असं लिहून #nophoneforayear आणि #contest हॅशटॅग वापरत आपल्या ट्विटर किंवा इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकावी लागेल.... यासोबत तुम्ही फोनचा वापर का सोडत आहात आणि या वेळेचा वापर तुम्ही कसा कराल? हेही तुम्हाला सांगायचंय. कंपनी २२ जानेवारी रोजी एका युझरला सिलेक्ट करून त्याला स्मार्टफोनऐवजी वापरण्यासाठी एक जुना फोन देईल.