मुंबई : व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता व्हॉट्सऍपवरून पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयनं व्हॉट्सऍपला यासाठीची परवानगी दिली आहे. या आधी गुगल पे, फोन पे आणि इतरही माध्यमांद्वारे पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात आता व्हॉट्सऍपची भर पडली आहे. यामुळे भारतातील डिजिटल पेमेंट पद्धतीला आणखी बळ मिळेल असा विश्वास जाणकारांकडून वर्तवला जात आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून व्हॉट्स ऍप प्रायोगिक तत्वावर ही सुविधा देत आहे. मात्र त्याला एन पी सी आय ची परवानगी नसल्यानं, ती आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आली नव्हती. संपूर्ण भारतात आजच्या तारखेला तब्बल ४० कोटी जण व्हॉट्स ऍप वापरत आहेत. त्याचवेळी गुगल पेचे भारतात साडे सात कोटी आणि फोन पेचे ६ कोटी ग्राहक आहेत.
व्हॉट्स ऍप मेसेजबाबत एक नवं फिचर घेऊन आलं आहे. आलेले मेसेज सात दिवसांनंतर व्हॉट्सऍपवरून हटणार आहेत. यासाठी व्हॉट्स ऍपवर नव्यानं समावेश होणारं डिसअपिअरिंग मेसेजेस हा ऑप्शन मोबाईलधारकाला ऑन ठेवावा लागणार आहे. त्यामुळे नव्याने आलेले मेसेज सात दिवसांनंतर आपोआप व्हॉट्स ऍपवरून हटणार आहेत.