मुंबई : तुमचा मोबाईल नंबर १३ आकडी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या बातमीची सत्यता पडताळण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
दूरसंचार विभागानं बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम डिव्हाईसचे नंबर १३ आकडी करायला सांगितलं आहेत. फक्त एम-टू-एम मोबाईल नंबरच १३ आकडी होणार असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार आहेत.
एम-टू-एम म्हणजेच मशीन-टू-मशीन सिस्टिम. व्यावसायिक वापरासाठी या सिस्टिमचा वापर केला जातो. या सिस्टिममध्ये दोन व्यक्तींचा एकमेकांशी संवाद होत नाही. एम-टू-एम सिस्टिम वायरलेस उपकरणांना जोडून त्याचा व्यावसायिक वापर करता येतो. एम-टू-एममध्ये डेबिट-क्रेडिट कार्डसाठी वापरण्यात येणारी स्वाईप मशिन, स्मार्ट इलेकट्रिक मिटर्स तसंच विमान आणि जहाजाला ट्रॅक करण्यासाठी जे जीपीएस वापरलं जातं, त्यासाठी एम-टू-एम सिस्टिम वापरली जाते.
मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली ग्राहकांची संख्या लक्षात घेता एम-टू-एमसाठी १३ अंकी नंबर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. १ जुलैपासून एम-टू-एम सिस्टिम असलेल्या डिव्हाईसचे नंबर १३ आकडी होणार आहेत.