मुंबई : मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये सुरु असलेली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये आता ट्राय म्हणजेच टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं भर टाकली आहे. ट्राय लवकरच पब्लिक वायफाय हॉटस्पॉटचं पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. ट्रायचं हे प्रोजेक्ट पब्लिक डेटा ऑफिसच्या नावानं सुरू होणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या फोन बूथ प्रमाणेच हे वायफाय वापरता येणार आहे.
ट्रायकडून या स्कीमबाबत कोणतंही स्पष्टीकरण आलं नसलं तरी सुरुवातीला ही स्कीम २ रुपये ते २० रुपयांमध्ये मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे वायफाय वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचा केवायसी आणि ओटीपीचा वापर करावा लागणार आहे. पब्लिक वायफाय हॉटस्पॉटमुळे नागरिकांना स्वस्तामध्ये इंटरनेट वापरायला मिळेल तसंच नेटवर्कवरचा ताणही कमी होईल, असं ट्रायकडून सांगण्यात येत आहे.
हे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी ट्रायनं अॅप प्रोव्हायडर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. या प्रोजेक्टसाठी कंपन्यांना २५ जुलैपर्यंत तपशील द्यावा लागणार आहे.