एकदा चार्ज करा, 7 महिने कार पळवा, बाजारात येतेय पहिली सोलर ई-कार

एकदा कार चार्ज केल्यावर तब्बल 7 महिने चिंता करायची गरज नाही, असा दावा कंपनीनं केलाय. 

Updated: Jun 14, 2022, 11:35 PM IST
एकदा चार्ज करा, 7 महिने कार पळवा, बाजारात येतेय पहिली सोलर ई-कार title=

मुंबई : पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून जगभरात ई-व्हेईकलचा वापर सुरू झालाय. मात्र चार्जिंगच्या सोयी नसल्यानं दूरवर जाण्यासाठी ई कार गैरसोयीच्या असतात. मात्र आता चक्क सौरऊर्जेवर बॅटरी चार्ज करणारी कार बाजारात येणार आहे. (this solar electric car will run for 7 months on a full charge once gets a driving range of 625Km)

सौरऊर्जेवर चालणारी पहिली ई कार बाजारात येतेय. विशेष म्हणजे एकदा कार चार्ज केल्यावर तब्बल 7 महिने चिंता करायची गरज नाही, असा दावा कंपनीनं केलाय. नेदरलँड्सची लाईटइयर झिरो ही ई व्हेईकल स्टार्टअप कंपनी कारच्या निर्मितीसाठी सज्ज झालीये. याच वर्षात नोव्हेंबरमध्ये कारची डिलिव्हरी सुरू होईल असंही कंपनीनं जाहीर केलंय. 

कारचं छत आणि बॉनेटवर 54 वर्गफूट क्षेत्रफळाचं सोलर पॅनल देण्यात आलंय. कारसोबत  60 किलोवॅटची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आलीये. 
कारची इलेक्ट्रिक मोटर 174 हॉर्सपॉवर ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे. एकदा बॅटरी फूल झाल्यावर ताशी 110 किलोमीटर वेगानं 625 किलोमीटर अंतर कापलं जाऊ शकतं.

विशेष म्हणजे केवळ 10 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर वेग गाठण्याची या कारची क्षमता आहे. विशेष एअरोडायनॅमिक डिझाईनमुळे कमी ऊर्जेत कार अधिक वेगात आणि जास्त अंतर कापते असा दावाही लाईटइयर झिरोनं केलाय. 

अर्थात या सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी कार उन्हात पार्क करावी लागेल. नेदरलँड्ससारख्या युरोपियन देशात फारसं सूर्यदर्शन होत नाही. मात्र भारतासारख्या कडक उन असलेल्या देशांमध्ये ही सोलर ई कार नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.