नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवशी तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. देशातील मोठी कार निर्माता कंपनी 'मारुती सुझुकी'ने (Maruti Suzuki) काही कारच्या किंमतीत कपातीची घोषणा केली आहे. मारुतीकडून कारच्या किंमतीत ५ हजार रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. मारुतीकडून कारच्या नवीन किंमती (Maruti) २५ सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या आहेत.
'मारुती सुझुकी'ने ज्या कारच्या किंमतीत कपात केली आहे त्यात, ऑल्टो ८००, ऑल्टो के १०, स्विफ्ट डिझेल, सिलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिजायर डिझेल, टूर एस डिझेल, विटारा ब्रेजा आणि एस-क्रॉस या कारचा समावेश आहे.
या मॉडेल्सशिवाय, कंपनीच्या इतर कार आणि डिजायर, स्विफ्ट आणि बलेनोच्या पेट्रोल मॉडेल्सच्या किंमतीत कोणतीही कमी करण्यात आलेली नाही.
'मारुती'ने, कार खरेदी करणाऱ्यांना कॉरपोरेट करात झालेल्या कपातीचा फायदा दिला आहे. कॉरपोरेट करात झालेल्या कपातीनंतर कंपनीने कारच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
मारुतीने दिलेल्या माहितीनुसार, किंमतीमध्ये जी कपात करण्यात आली आहे, ती कंपनी डिलरशीपवर मिळणाऱ्या प्रमोशनल ऑफर्सहून वेगळी आहे. किंमती कमी झाल्याने कंज्युमर सेंटिंमेन्ट मजबूत होतील. तसेच सणा-सुदीच्या दिवसांत याची मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
सणांच्या काळात मागणी वाढवण्यासाठी कंपनी नवीन लॉन्चवरही लक्षकेंद्रीत करत आहे. कंपनीची Spresso कार ३० सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. विक्रीतील घसरणीवर मात करणे हा या कारला सणाच्या दिवसांत लॉन्च करण्यामागील हेतू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सणांचा काळ नेहमीच ऑटो सेक्टरसाठी खास असून, यावेळी देखील सणाच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे.