पुद्दुचेरी : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना गाडी चालवणे आता अशक्य झालं आहे. ज्यामुळे लोकं वेगवेगळ्या पर्यायांकडे वळत आहेत. त्यात इलेक्ट्रिक गाडी हा सगळ्यात चांगला पर्याय समोर आला आहे. ज्यामुळे बरेच लोकं आता इलेट्रिक कार किंवा बाईक विकत घेत आहेत. तुम्ही अनेक इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर पाहिले किंवा ऐकले असेल की एका चार्जवर त्या शेकडो किलोमीटर चालवता येतात. पण एका 58 वर्षीय व्यक्तीने असे तंत्रज्ञान शोधून काढले आहे जे इलेक्ट्रिक वाहनांसाठी क्रांती ठरू शकते.
या व्यक्तीने एक इलेक्ट्रिक बाइक तयार केली आहे ज्यामध्ये असलेली बॅटरी दुसर्या बॅटरीद्वारे चार्ज केली जाते, त्यामुळे ई-बाईकला चार्ज करण्याची गरज नाहीशी होते.
यामुळे बाईकला आता विना चार्ज करता चालवता येणं शक्य झालं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रिमध्ये मोठी क्रांती घडवून आणण्याचे काम पुद्दुचेरीचे विजयन प्रेमानंद यांनी केलं आहेत. त्यांची ही बाईक रस्त्यावर चालवताना स्वत: चार्ज होते.
विजयन प्रेमानंद यांनी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेडमार्क्स देखील प्राप्त केलं आहे.
प्रेमानंद म्हणाले, "ही अशा तंत्रज्ञानाची सुरुवात आहे जिथे तुम्हाला तुमचे वाहन चार्ज करण्यासाठी कोणत्याही इलेक्ट्रिक ग्रिडची गरज भासणार नाही. अशी ई-बाईक वापरण्याचा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला चार्जिंग स्टेशनवर जाण्याची गरज भासणार नाही. बाईक चालताना स्वतः चार्ज होते आणि या तंत्रज्ञानामुळे विजेची बचत होते."
ते पुढे म्हणाले, "आपल्या देशाच्या ग्रामीण भागात अनेक वेळा वीज नसते आणि पुरेसा वीजपुरवठाही मिळत नाही. आमच्या इलेक्ट्रिक ग्रीड प्रणालीच्या वापराने या समस्येवर मात केली जाऊ शकते. याशिवाय चार्जिंग स्टेशनवर वेळ वाया घालवण्याची गरज भासणार नाही. मला विश्वास आहे की, हे इलेक्ट्रिक वाहनांचे भविष्य आहे."
पुढे या तंत्रज्ञानाबाबत बोलताना ते म्हणाले की, "इलेक्ट्रिक स्टोरेज यंत्राला जोडलेल्या चाकाच्या हबवर जनरेटर बसवण्यात आला आहे. हा विद्युत जनरेटर चाकाच्या फिरण्याने निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो."
त्यांनी डिझाइनमध्ये असे बदल केले आहेत की दोन्ही बॅटरी एकमेकांना चार्ज करत राहतात. ते म्हणाले, "दोन्ही बॅटरी चार्ज झाल्यामुळे ऊर्जेचा वापर खूपच कमी होतो. सामान्य बॅटरीची शक्ती लवकर संपते आणि यापासून मुक्त होण्यासाठी, मला एक कल्पना सापडली आहे ज्यामध्ये एकामागून एक बॅटरी चार्ज करण्याचे काम केले जाते."
त्यांनी सर्व प्रमुख वाहन निर्मात्यांना हे तंत्रज्ञान वापरण्यास सांगितले असून ते कंपन्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत. प्रेमानंद यांनी सांगितले की, त्यांनी सध्या लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे आणि जर त्यात जलद चार्जिंग बॅटरी वापरल्या गेल्या तर परिणाम आणखी चांगले होतील.