मुंबई : यंत्रमानवांवर जगभरात संशोधन सुरू आहे... तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही बरंच काम होतंय... पण या दोन्ही तंत्रांची सांगड घातली, तर एक वेगळंच विश्व निर्माण होऊ शकतं... चीनमधल्या एका प्रदर्शनात याची प्रचिती आली... चीनची राजधानी बीजिंगमध्ये एक अनोखं प्रदर्शन भरलं होतं... यात केवळ यंत्रमानव नाहीत... तर विचार करू शकणारे यंत्रमानव आहेत.... कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहाय्यानं या यंत्रमानवांची घडण करण्यात आलीय. त्यामुळे यापूर्वी यंत्रमानवांना शक्य नसलेली कामंही ही यंत्र करू शकतात... बीजिंग इंटरनॅशनल हाय टेक एक्सपोमध्ये याची झलक दिसली...
हा यंत्रमानव घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला सोबत करेल... त्याच्यासोबत गप्पा मारेल... एवढंच नव्हे, तर तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असेल तर हा यंत्रमानव ते ओळखून योग्य मदत मिळवू शकेल...
वयामुळे किंवा एखाद्या अपघातामुळे एखाद्या व्यक्तीला चालता येत नसेल, तर त्यासाठी फायद्याचं ठरू शकेल असं रोबोटिक एक्झोस्केलेटन बीजिंगच्या प्रदर्शनामध्ये पहायला मिळालं... पायांवर हा रोबो जोडल्यावर सामान्य व्यक्तीप्रमाणे चालणं शक्य होईल...
या प्रदर्शनात चक्क एक रखवालदार यंत्रमानवही होता... हा यंत्रमानव एखाद्या मोठ्या वस्तीवर पहारा देऊ शकेल आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास यंत्रणांना सतर्क करू शकेल... याखेरीज एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहूनही तो धोक्याचा अंदाज बांधू शकेल...
सध्या हे सगळे यंत्रमानव बीजिंगच्या प्रदर्शनातच दिसत असले, तरी आगामी काळात ते तुमच्या-आमच्या दिवाणखान्यात आले, तर आश्चर्य वाटायला नको...