पालकांनो सावधान!!! तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतायत? मग हॅकर्सचा आहे तुमच्यावर डोळा

ऑनलाईन गेमिंगमधून हॅकर्सना गोपनिय माहिती मिळू शकते 

Updated: Mar 6, 2021, 05:13 PM IST
पालकांनो सावधान!!! तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतायत? मग हॅकर्सचा आहे तुमच्यावर डोळा title=

तुमच्या मुलांना तुम्ही ऑनलाईन गेम खेळायला देत असाल तर आताच सावध व्हा. कारण हे ऑनलाइन गेम मुलांसह तुमच्या कुटुंबियांसाठी घातक ठरू शकतात. हॅकर्सकडून या गेम्सच्या माध्यमातून माहितीचा गैरवापर होत असल्याचं लक्षात येत असल्यानं सायबर विभागानेही सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

 लॉकडाऊनच्या काळात मुलांचा वेळ जावा म्हणून मुलं मोबाईलवरच आपला विरंगुळा शोधू लागली, काही पालकांनीही आपल्या मुलांच्या हातात मोबाईल दिला. मात्र त्यामुळे सायबर गुन्हेगार आता ऑनलाइन गेमच्या नावाखाली मुलांचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्नात असल्याचं निदर्शनास आलं आहे.

अनेक गेम्समध्ये पैसे भरायलाही सांगितलं जातं. मात्र अशावेळी बँक डिटेल्स किंवा तुमच्या फोनमधून तुमचा आवाज, फोटोचा अक्सेसही दिला जातो. अशात तुमची अतिशय गोपनीय माहितीसुद्धा या हॅकर्सना अगदी सहजरित्या मिळू शकते. अनेक संकेतस्थळं म्हणजेच वेबसाईट ह्या बनावटही असू शकतात. तेव्हा तुमची मुलं कॉम्प्युटरवरही ऑनलाईन गेम खेळत असतील, तर तुमच्या कॉम्प्य़ुटरमधलाही डेटा हॅकर्सच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

लहान मुलांना ऑनलाईन फसवणुकीबाबत फार माहिती असतेच असं नाही, अशात ते स्वत:हूनही गोपनीय माहिती दुसऱ्याला देण्याची चूक करू शकतात. त्यामुळे पालकांनीच अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

पालकांनी काय खबरदारी घ्यावी?

1. लहान मुलांनी कोणत्याही ऑनलाइन गेमच्या लेवल खरेदी करण्यापूर्वी पालकांचा सल्ला घ्यावा.
2. आपल्या परवानगीशिवाय मुलांना गेम सुरू करू देऊ नका. आपली मुलं खेळत असलेला गेम सुरक्षित आहे की नाही याची      खात्री करा.
3. पालकांनी आपली मुलं कोणत्या दर्जाचा ऑनलाइन गेम खेळत आहेत याबाबत सतर्क राहावे.
4. मुलांना खेळण्यासाठी वैयक्तिक मोबाइल किंवा ऑफिस मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही डिवाइस देण्याचं टाळावं.

5. आपल्या मुलांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसारखे कोणतेही डिव्हाईस देण्यापूर्वी

  त्यात आपला बँक तपशील नाही ना? याची खात्री करून घ्या.

6. आपला आर्थिक डेटा, बँक खाते तपशील, डेबिट-क्रेडिट कार्ड पिन क्रमांक लहान मुलांना कळू देऊ नका.

7. आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवा. आधी वास्तविक जगात नंतर ऑनलाइन गेमिंग जगात त्यांना जगायला शिकवा.