नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus) दरम्यान संपर्ण देश लॉकडाऊन आहे. अशात सध्या व्हॉट्सअप (WhatsApp) मनोरंजनाचा एक पर्याय ठरतो आहे. पण यातही आता काही निर्बंध येणार आहेत. व्हिडिओ स्टेटसमध्ये अपडेट करण्यावर हे निर्बंध असणार आहेत.
फेसबुकने याबाबत एक ट्विट केलं आहे. व्हॉट्सअपमध्ये स्टेटस अपडेट करताना व्हिडिओची सेकंद कमी करण्यात येणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सअपवर 30 सेकेंदापर्यंतचा व्हिडिओ अपलोड करता येत होता. पण आता ही सेकंद कमी करण्यात आली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सअप स्टेटसमध्ये केवळ 16 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करता येणार असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक यूजर्स आपल्या व्हॉट्सअप व्हिडिओमध्ये चीनी ऍप टिकटॉक (TikTok), वीबो किंवा वीमेटचे (VMate) व्हिडिओ अपलोड करत असल्याचं बोललं जातं. अशात चीनी कंपन्यांची ब्रँडिंग होते आणि संपूर्ण ट्रॅफिक तिथे जातं. या चीनी कंपन्यांनी व्हॉट्सअपनुसारच त्यांचा व्हिडिओ 30 सेकंद ठेवल्याचं सांगितलं जातंय. पण आता व्हॉट्सअप आपल्या यूजर्सला ओरिजनल कंटेन्ट तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. त्यामुळे स्टेटसमध्ये व्हिडिओ केवळ 16 सेकंद बनवण्यात येत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्हॉट्सअपच्या वापरात अधिक वाढ झाली आहे. व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे सर्व्हरवर भार पडतोय.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. तर काही शक्य असलेल्या कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000वर गेला आहे. तर आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे.