coronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm

भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे.

Updated: Mar 30, 2020, 11:50 AM IST
coronavirus : PM CARES Fundमध्ये 500 कोटींची मदत करणार Paytm title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधी लढाईत योगदान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना मदतीचं आवाहन केलं आहे. अगदी सामन्यांपासून ते समाजातील विविध वर्गातील लोक, समाजसेवक, उद्योगपती, कलाकार मदतीसाठी सरसावले. आपापल्या क्षमतेनुसार अनेक लोक मदत करतायेत. यादरम्यान भारतातील प्रमुख डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म पेटीएमही (Paytm) मदतीसाठी पुढे आलं आहे. पेटीएमने पीएम केअर्स फंडमध्ये 500 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचं सांगितलं आहे.

कोविड - 19 विरुद्ध लढा देण्यासाठी आपल्या वापरकर्त्यांना यासाठी मदत करण्याचं आवाहन करत कंपनीने, पेटीएम वॉलेट, यूपीआय आणि पेटीएम बँक डेबिट कार्डचा वापर करुन पेटीएमद्वारे केलेल्या प्रत्येक देयकासाठी कंपनीने फंडात १० रुपयांपर्यंत अतिरिक्त योगदान करणार असल्याचं सांगितलं आहे.

पेटीएमने, कोरोना रोगावर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांमध्ये सरकारला मदत करण्याचं आमचं कर्तव्य असून ते बजावण्याचा अभिमान असल्याचं सांगितलं. आमचे यूजर्सही सढळ हस्ते पीएम केअर्स फंडमध्ये मदत करुन अनेकांचं आयुष्य वाचवण्यासाठी मदतीसाठी पुढे येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेकांनी यासाठी सढळहस्ते मदत केली आहे. रतन टाटा यांनी 500 कोटी, तर टाटा सन्सकडून 1000 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटींची मदत केली आहे. तर सचिन तेंडूलकरने केंद्र आणि राज्य सरकार मिळून 50 लाखांची मदत केली आहे. त्याशिवाय अनेक समाजसुधारक, कलाकार, सामान्य जनता यांनीही पुढे येत मदत केली आहे.