Job Offer For Gamers: तुम्हाला Mobile Games ची आवड असेल तर 10 लाखांची नोकरी तुमची वाट पाहतेय

Rs 10 lakh job offer for gamers: अनेकदा मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांना त्यांच्या पालकांकडून ओरडा खावा लागतो. मात्र आता हीच गेम खेळण्याची सवय आणि आवड तुम्हाला एक चांगला रोजगार आणि पैसे मिळवून देऊ शकते. तशी जॉब ऑफरच एका कंपनीने भारतीय तरुणांना देऊ केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 31, 2023, 05:52 PM IST
Job Offer For Gamers: तुम्हाला Mobile Games ची आवड असेल तर 10 लाखांची नोकरी तुमची वाट पाहतेय title=
मोबाईल गेम खेळण्याची तुम्हालाही आवड आहे का?

Rs 10 Lakh Job Offer For Gamers: तुम्हाला जर मोबाईल गेम खेळायची आवड असेल तर तुमची ही आवडच तुमच्या रोजगाराचं माध्यम ठरु शकतं. आता ही ओळ वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. सामान्यपणे पालकांकडून ज्या मोबाईल गेम्ससाठी ओरडा खायला मिळतो त्याच गेम्सच्या माध्यमातून थेट ड्रीम जॉब लागण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. चिनी मोबाईल कंपनी असलेल्या आयक्यूओओ (iQoo) सध्या चीफ गेमिंग ऑफिसर (Chief Gaming Officer) पदासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेस कामासाठी तब्बल 10 लाख रुपये वेतन दिलं जाणार आहे.

काय आहेत अटी?

चीफ गेमिंग ऑफिसर (CGO) पदासाठी वयाची अट कंपनीने घातली आहे. केवळ 18 वर्षे ते 25 वर्ष वय असलेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे ही ऑफर केवळ भारतीय उमेदवारांसाठी आहे. म्हणजेच ही नेमणूक केवळ भारतामधील कामासाठी केली जाणार आहे. आयक्यूओओ कंपनीच्या वेबसाईटवर या पदासाठीचा उमेदवारी अर्ज उपलब्ध आहे. हा अर्ज भरल्यानंतरच उमेदवाराचा विचार केला जाईल.

शेवटची तारीख काय?

ऑनलाइन माध्यमातून हा फॉर्म भरुन अर्ज केल्यानंतर उमेदवारांची स्क्रीनिंग म्हणजेच फेरतपासणी केली जाईल. शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांकडून सविस्तर माहिती मागवली जाईल. या सर्व उमेदवारांच्या मुलाखतींबरोबरच त्यांना एक गेमिंग राऊंड खेळवा लागणार आहे. या राऊंडमध्ये पास होणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख 11 जून आहे. 

चीफ गेमिंग ऑफिसरचं काम काय?

चीफ गेमिंग ऑफिसरला कंपनीला गेम्ससंदर्भातील अनुभव आणि रिव्ह्यूबद्दलचे सविस्तर अहवाल वेळोवेळी सादर करावे लागतील. या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला देशभरातील आघाडीच्या गेमर्सबरोबरच गेमिंग कम्युनिटींबरोबर आयक्यूओओ कंपनीच्या गेमिंग प्रोडक्ट्सबद्दल समन्वय साधावा लागणार आहे. या सर्व गेमर्सकडून कंपनीच्या प्रोडक्ट्समधील गेम्ससंदर्भातील अनुभव आणि सल्ले घेणे आणि ते संबंधितांपर्यंत पोहचवण्याचं काम या व्यक्तीला करावं लागणार आहे. 

स्मार्टफोनवरील गेमिंगचा अनुभव अधिक चांगला आणि हवाहवासा वाटवा यासंदर्भातील इनसाइट्स कंपनीला पुरवण्याचं कामही चीफ गेमिंग ऑफिसरला करावं लागणार आहे. यामध्ये गेमसंदर्भातील सल्ले, कोणत्या पद्धतीचे गेम असावेत, नसावेत, प्रेझेन्टेशन आणि गेमिंग इंटरप्रिटेशनबरोबरच युझर एक्सपिरियन्ससंदर्भातील पैलूंवर या व्यक्तीने काम करणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे खरोखरच मोबाईल गेम्सची आवड असलेल्यांसाठी आणि सर्व अटी पूर्ण करत असणाऱ्यांना या नोकरीसाठी नक्कीच प्रयत्न करता येईल.