सॅन फ्रान्सिस्को : सध्या ऑनलाईन बिझनेसमध्ये 'अमेझॉन'नं आपला झेंडा गाडलाय. परंतु, लवकरच 'इन्स्टाग्राम' हा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मही ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. इन्स्टाग्रामचे नवे प्रमुख एडम मुसेरी यांनी याची घोषणा केलीय. इन्स्टाग्रामचे सध्या जगभरात १० लाख युझर्स आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कार्यभार हाती घेतल्यानंतर एका सार्वजनिक मंचावर बोलताना, दुकानदार - विक्रेते आणि इन्स्टाग्राम युझर्सच्या मोठ्या संख्येला जोडण्याचा आपला उद्देश असल्याचं मुसेरी यांनी म्हटलं होतं.
वृत्तसंस्था 'एफे'नं दिलेल्या माहितीनुसार, फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेला 'इन्स्टाग्राम'ला एका सेल्स पोर्टलमध्ये बदलण्याची मुसेरी यांची योजना आहे.
सध्या ई कॉमर्स क्षेत्रात काही कंपन्यांचा दबदबा आहे. यामध्ये चीनची अलीबाबा आणि जेडी डॉट कॉम तसंच अमेरिकन कंपनी अमेझॉन, ईबे आणि वॉलमार्टचा समावेश आहे. फोटो शेअरिंग ऍप 'इन्स्टाग्राम'नं डायरेक्ट सेल्सचा पायलट प्रोग्राम मार्च महिन्यातच सुरू केला होता. परंतु, हा केवळ २० ब्रान्डपर्यंतच सीमित होता. या ब्रान्डमध्ये झारा, बरबेरी, मिशेल कोर्स, नाइकी, अदिदास, प्राडा, युनिक्लो, डिओर, ऑस्कर डे ला रेंटा आणि एच एन्ड एम इत्यादींचा समावेश आहे.