२०१९ मध्ये भारतीयांनी वापरला तब्बल एवढा मोबाईल इंटरनेट डेटा

आज जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो, त्याच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करतो. 

Updated: Jan 1, 2020, 09:35 PM IST
२०१९ मध्ये भारतीयांनी वापरला तब्बल एवढा मोबाईल इंटरनेट डेटा title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आज जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो, त्याच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करतो. देशातल्या मोबाईल युजर्सनी इंटरनेट वापरात विक्रम केलाय. गेल्या वर्षभरात भारतीयांनी तब्बल ५ हजार ४०० कोटी जीबी इंटरनेट डाटा वापरलाय.

भारतातील बहुतांश मोबाईल युजर्सच्या हातात स्मार्टफोन आलाय. २०१७ पासून भारतात स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु झाला. शिवाय इंटरनेट डेटाही स्वस्त उपलब्ध झाला, त्यामुळे मोबाईल हाताळणारा प्रत्येकजण व्हिडिओ डाऊनलोड आणि अपलोड करू लागला. त्यात टिकटॉक आणि व्हॉट्सऍपमुळं इंटरनेटचा वापर जास्त वाढला.

एका आकडेवारीनुसार २०१४ मध्ये भारतात अवघा ८१ कोटी जीबी इंटरनेट डाटाचा वापर झाला होता. तोच वापर वाढून २०१९मध्ये तब्बल ५ हजार ४९१ कोटी जीबी एवढा झाला.

मोबाईल कंपन्यांनी सुरुवातीला स्वस्त डेटा देऊ केला. आता त्यांनी डेटाच्या किंमती वाढवल्यात. तरीही भारतीयांचं डेटा वापरणं कमी झालेलं नाही. जगात इंटरनेट वापरात चीन अव्वल आहे. त्यानंतर इंटरनेट वापरात भारतीयांचा क्रमांक लागतो. जगात ३.८ अब्ज लोक इंटरनेट वापरतात. त्यापैकी ६६ कोटी भारतीय आहेत. भारतीय इंटरनेटशिवाय राहू शकत नाही असं तज्ज्ञांनाही वाटू लागलंय.

तरुणाईसाठीही सबकुछ मोबाईल झालाय. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेटशिवाय कसं होणार असं तरुणाईला वाटतं. भारतीयांचं मोबाईलवेड हे सर्वश्रूत आहे त्यामुळंच भारत जगातली सर्वात मोठी मोबाईलची बाजारपेठ झालीय. जगातील सगळ्या आघाडीच्या मोबाईल कंपन्या भारतात आपला फोन लाँच करण्यासाठी उत्सुक असतात. भारतीयांचा डेटा वापराची गती पाहता येत्या काळात भारतीय चीनलाही डेटावापरात मागं टाकतील यात शंका नाही.