मुंबई : डिजिटल पेमेंट सेवांच्या वापरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खरे तर कोरोना काळानंतर लोकांनी याचा वापर करणे वाढले, जेणे करुन कुठेहे कोणाशीही संपर्क होऊ नये. तसेच ही खूप सोपी पद्धत देखील आहे, कारण यामुळे कुठेही सोबत पैसे घेऊन जावे लागत नाही. तुम्ही पैसे जरी विसरला असाल आणि कोणतीही महत्वाची गोष्ट तुम्हाला खरेदी करायची असेल, तर तुम्ही फोनचा वापर करुन पेमेंट करु शकता. तसेच हे खूप सोपे देखील आहे.
या सगळ्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला. ज्यामुळे लोक आता त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट पॅक मारु लागले आहेत. परंतु जर तुम्ही एखाद्या व्यवहाराच्या मध्यभागी असाल आणि अचानक इंटरनेट काम करत नसेल तर? अशावेळी मात्र ही सोपी पद्धत आपल्याला महागात पडते.
कारण यामुळे आपले पेमेंट होत नाही म्हणजेच आपण समोरच्या व्यक्तीला पैसे देऊ शकत नाही किंवा काहीवेळा दोन वेळा पैसे देखील दिले जातात, ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.
परंतु तुम्हाला माहित आहे डिजिटल व्यवहार ऑफलाइन करण्याचा एक मार्ग आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm सह कोणालाही इंटरनेटशिवाय पैसे पाठवू शकता. इंटरनेटशिवाय UPI वापरण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या डायलरवर *99# USSD कोड वापरावा लागेल.
इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहारांसाठी तुमच्याकडे तुमचा स्वतःचा फोन आणि पूर्व नोंदणीकृत बँक खाते असणे आवश्यक आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने स्मार्टफोन आणि सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी *99# सेवा सुरू केली. त्यामुळे जर तुम्हाला नेटशिवाय UPI पेमेंट कसे करायचे असा प्रश्न पडत असेल, तर ते आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
BHIM ऍप डाउनलोड करा आणि एक-वेळ नोंदणी पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही ऑफलाइन UPI व्यवहार करू शकाल:
STEP 1: तुमच्या फोनचा डायल पॅड उघडा आणि टाइप करा (*99#).
STEP 2: त्यानंतर तुम्हाला नवीन मेनूवर नेव्हिगेट केले जाईल, ज्यात सात पर्याय दिसतील ज्यात पैसे पाठवा, पैसे मिळवा, शिल्लक तपासा, माझे प्रोफाइल, प्रलंबित विनंती, व्यवहार आणि यूपीआय पिन असे दिसेल
STEP 3: पैसे पाठवण्यासाठी तुमच्या डायल पॅडवरील क्रमांक 1 दाबा. यामुळे तुम्ही तुमचा नोंदणीकृत फोन नंबर, UPI आयडी, किंवा तुमचा खाते क्रमांक आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकाल.
STEP 4: तुम्ही UPI ID पर्याय निवडल्यास, तुम्हाला प्राप्तकर्त्याचा म्हणजेच समोरील व्यक्तीच्या UPI ID टाकावा लागेल.
STEP 5: आता आपण समोरील व्यक्तीला देऊ इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि नंतर आपला UPI पिन क्रमांक प्रविष्ट करा.
STEP 6: 'पाठवा' पर्याय दाबा आणि व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला पुष्टी मिळेल.
यशस्वी व्यवहारानंतर, तुम्हाला विचारले जाईल की, तुम्हाला या प्राप्तकर्त्याला भविष्यातील व्यवहारांसाठी लाभार्थी म्हणून जतन करायचे आहे का? यासाठी तुमच्याकडून सेवा शुल्क म्हणुन 0.50 पैसे आकारण्यात येतील.