मुंबई : कोरोना महामारीच्या काळात बहुतांश लोक जास्तीत जास्त डिजिटल व्यवहारांकडे वळले आहे आणि त्यानंतर आता जर तुम्ही पाहिलंत, तर जास्तीत जास्त लोकं आता ऑनलाईन बँकिंगकडे वळले आहेत. ऑनलाईन बँकिंगमध्ये UPI हे डिजिटल व्यवहाराचे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. ज्यामुळे तुम्हाला आता मोठ्या मॉलपासून ते लहानातल्या लहान दुकानदारांपर्यंत सगळ्यांकडे हा पर्याय मिळतो. ज्यामुळे आता लोकांनी स्वत:कडे पैसे ठेवणं देखील बंद केलं आहे. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे या पेमेंटपद्धतींचा तोटा देखील आहे. (UPI Payment Safety Tips)
आजकाल UPI व्यवहारांशी संबंधित फसवणुकीच्या घटनांबद्दल तुम्ही ऐकल्या असणार, त्यात या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी UPI वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अशावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, ज्यामुळे तुम्ही या फसवणूकीपासून वाचू शकता, याच्या काही टीप्स (UPI Payment Safety Tips) आम्ही तुम्हाला देणार आहोत.
हे लक्षात घ्या की, तुम्हाला पैसे घेण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही, UPI पिन तुम्हाला तेव्हाच टाकावा लागतो, जेव्हा तुम्ही पैसे समोरच्या व्यक्तीला देता, त्यामुळे कोणाकडून पैसे स्वीकारताना UPI पिन टाकू नका, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते, तसेच तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे ट्रांसफर करत असाल तर त्याला फंट ट्रांसफर करु नका.
क्यूआर कोडच्या मदतीने गुन्हेगार तुमची फसवणूक करू शकतात. कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तुम्ही त्याचा QR कोड स्कॅन करु नका. कारण QR कोड तेव्हा स्कॅन केलं जातं जेव्हा तुम्ही समोरील व्यक्तीला पैसे देता. त्यामुळे कोणाकडून पैसे घेताना तुम्हाला त्यांचा QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही, उलट समोरील व्यक्ती तुमचा QR कोड स्कॅन करुन तुम्हाला पैसे देईल.
तसेच तुमचा UPI वॉलेट पिन, कार्डसंबंधीत माहिती जसे की पिन, वन टाइम पासवर्ड (OTP), CVV, एक्पायरी डेट, ग्रिड मूल्य, कार्ड प्रकार (व्हिसा, मास्टरकार्ड, रुपे इ.) कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही शेअर करू नका. जरी ती व्यक्ती बँकेच्या वतीने दावा करत असली तरी सावधगिरी बाळगा आणि कोणतीही माहिती शेअर करू नका.
अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन किंवा कॉलच्या आधारे स्क्रीनशेअर, एनीडेस्क, टीम व्ह्यूअर इत्यादी कोणतेही तृतीय पक्ष ऍप कधीही डाउनलोड करू नका. तो कॉलर बँकेकडून कॉल करतोय असे सांगत असला तरी सावधगिरी बाळगा.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीने सूचना किंवा विनंती केल्यानंतर कोणतेही ऍप्लिकेशन / UPI ऍप / पेमेंट वॉलेट कधीही डाउनलोड करू नका.
गुगल, फेसबुक किंवा ट्विटरवर कधीही हेल्पलाइन नंबर शोधू नका. याशिवाय, अधिकृत वेबसाइट देखील तपासा.
तुमच्या नंबरचे बनावट सिम घेऊन गुन्हेगार तुमची फसवणूकही करू शकतात. हे टाळण्यासाठी, अज्ञात लोकांना तुमचा पत्ता, ईमेल यासंदर्भात उत्तर देऊ नका. विशेषता कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळा. तसेच अनोळखी ठिकाणी तुमचे डॉक्यूमेंट स्कॅन करणे किंवा झेरॉक्स काढणे टाळा.ॉ
UPI, ज्याला आपण इंग्रजीत युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतो, ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे, जी मोबाईल अॅपद्वारे कार्य करते. या अॅपद्वारे तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी बँक खात्यात पैसे परत मिळतात. तुम्ही UPI द्वारे बिले भरू शकता, ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता आणि नातेवाईक किंवा मित्रांना पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करावे लागेल. यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा.