नवी दिल्ली : आघाडीची आणि प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया (HMSI)ने भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक लॉन्च करण्याची योजना आखली आहे. होंडाची ही नवी बाईक बजाजच्या डिस्कवर आणि हीरोच्या ग्लॅमरला टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे.
होंडा मोटरसायकल लॉन्च करणार असलेल्या बाईकचं नाव CB 125 F असं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या बाईकची पेटेंट इमेज लीक झाली होती. नव्या बाईकची डिझाईन ही जुन्या मॉडेलपेक्षा खूपच वेगळी आहे.
नवी बाईक कंपनीची 125 CC ची प्रीमिअम कम्युटर बाईक असणार आहे. नव्या बाईकची हेडलॅम्प जवळपास पूर्वी प्रमाणेच आहे मात्र, लूक खूपच चांगला दिसत आहे.
नवी होंडा CB 125 F चे मडगार्ड डिझाइन पूर्णपणे नवे आहेत. फ्लुअल टँकची डिझाइनही नवी आहे ज्यामुळे बाईकचा लूक पूर्वीपेक्षा अधिक चांगला आहे. यासोबतच बाईकची सीटही मोठी आणि खाली आहे. यामुळे बाईकस्वाराला खूपच आराम मिळेल. एग्जॉस्ट स्लिम आणि स्टायलिश बनवण्यात आले आहेत. नव्या बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प असणार आहेत.
होंडाच्या CB 125F बाईकमध्ये होंडा शाईन प्रमाणेच बीएस4 इंजिन असण्याची शक्यता आहे. सिंगल सिलिंडर असलेल्या 125सीसी चं हे एअर कुल्ड इंजिन 7500 rpm वर 10 bhp ची पावर आणि 5500 rpm वर 11 न्यूटन मीटरचं टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स असणार आहे. मायलेजचा विचार केला तर, 60 ते 65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज असण्याची शक्यता आहे.
होंडा कंपनी नव्या आर्थिक वर्षात 18 प्रोडक्ट्सचे अपग्रेडेड मॉडेल लॉन्च करणार आहे. तसेच कंपनी भारतात डिलरशिप्स वाढवण्यावरही फोकस करत आहे. होंडा CB 125F या बाईकची विक्री ब्रिटनमध्ये सध्या सुरु आहे आणि लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे.
यापूर्वी होंडाने 2018 CB Hornet 160R ही गाडी लॉन्च केली होती. कंपनीने सीबी हार्नेट 160R ही गाडी चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली होती.