Elon Musk X : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव असणारा एलॉन मस्क अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. जिथं अनेकांची कल्पनाशक्ती थांबते तिथं या माणसाची कल्पनाशक्ती सुरु होते असं म्हणतही बरेचजण त्याची ओळख करून देतात. अशा या एलॉन मस्कनं त्याच्याकडेच मालकी असणाऱ्या X या सोशल नेटवर्किंग माध्यमासंदर्भात मोठी आणि तितकीच महत्त्वाची घोषणा केली आहे.
एक्सवरच पोस्ट शेअर करत मस्कनं यासंर्भातील माहिती दिली. ज्याअंतर्गत अनेक X युजर्सना आता सहजपणे Blue Tick मिळणार आहे. आतापर्यंत शुल्क आकारून ही सुविधा पुरवणाऱ्या X कडून वर्षाला 6800 रुपये आकारले जात होते. पण, आता मात्र हा खर्च कमी होणार आहे, किंबहुना Blue Tick फुकटातच मिळणार आहे. त्यासाठी कायम नियय आणि अटी मात्र लागू असतील हे लक्षात घेणं महत्त्वाचं.
एलॉन मस्कनं ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार ज्या X अकाऊंटवर 2500 वेरिफाईड सब्सक्रायबर किंवा फॉलोअर्स असतात त्यांना एक्सकडून काही प्रिमियम फिचर्स मिळणार आहेत. तर, ज्या अकाऊंटवर 5000 फॉलोअर्स आहेत त्यांना X ची Premium+ ही सुविधा मोफत मिळणार आहे.
एक्स या सोशल मीडियावर असणारं अकाऊंट वापरण्यासाठी X Premium आणि X Premium Plus असे दोन सशुल्क प्लान देण्यात येतात. यामध्ये X Premium प्लानसाठी महिन्याला 650 रुपये आणि वर्षभरासाठी 6800 रुपये मोजावे लागतात. तर, X Premium Plus प्लानसाठी महिन्याला 1300 रुपये आणि वर्षभरासाठी 13,600 रुपये मोजावे लागतात. पण, खुद्द एलॉन मस्कच्या सांगण्यानुसार काही अटींची पूर्तता करून तुम्ही हे प्लान अगदी फुकटात वापरू शकता.
Going forward, all accounts with over 2500 verified subscriber followers will get Premium features for free and accounts with over 5000 will get Premium+ for free
— Elon Musk (@elonmusk) March 28, 2024
सोप्या शब्दांत समजावं तर, X Premium मध्ये तुम्हाला जाहिराती 50 टक्के कमी प्रमाणात दिसतील. त्याशिवाय इथं Edit Post, लॉन्गर पोस्ट, Undo Post असे फिचर्स उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय तुम्हाला Blue Tick सुद्धा मिळणार आहे. तर, याच्या अपग्रेडेट फिचरमध्ये तुम्हाला जाहिरातीच दिसणार नाहीयेत. त्यामुळं आता एलॉन मस्कनं दाखवलेला हा उदारपणा पाहून या फिचरचा कितीजण वापर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.